जम्मू–कश्मीरात आठ दिवसांत चार दहशतवादी हल्ले, बंदीपोरा येथे एका दहशतवाद्याचा खात्मा
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी रविवारी नवी दिल्लीत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी आज जम्मू-कश्मीरमधील बंदीपोरा येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. अरागामच्या जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असून त्यांची शोधमोहीम सुरू आहे. 9 जूनपासून आठवडाभरात जम्मू-कश्मीरमध्ये रियासी, कठुआ आणि डोडा येथे चार दहशतवादी हल्ले झाले. दरम्यान, अमित शहा यांनी शून्य दहशतवादाचे लक्ष्य समोर ठेवण्याचे निर्देश दिले असताना दहशतवाद्यांची हिंमत आणखी वाढल्याने पेंद्रीय गृह मंत्रालयासमोर दहशतवादाचा बीमोड करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
अरागामच्या जंगलात रविवारपासूनच गोळीबाराचे आवाज ऐकू येत असल्याची माहिती मिळताच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी येथे शोधमोहीम सुरू केली. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. सोमवारी सकाळी शोधमोहीम तीव्र होताच दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह ड्रोनच्या माध्यमातून जंगलात आढळून आला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान रियासी येथे भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था करणार आहे. या प्रकरणी नवीन एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List