नांदेडचे पलटूराम! अशोक चव्हाणांमुळे माझा पराभव झाला नाही; प्रताप पाटील चिखलीकर यांनी टोपी फिरवली

नांदेडचे पलटूराम! अशोक चव्हाणांमुळे माझा पराभव झाला नाही; प्रताप पाटील चिखलीकर यांनी टोपी फिरवली

संपूर्ण जिल्ह्यात धन्यवाद सभा घेऊन पराभवाचे खापर अशोक चव्हाणांवर फोडणार्‍या प्रताप पाटील चिखलीकर यांनी अचानक पलटी मारली असून आपला पराभव मनोज जरांगे, मुस्लिम आणि घटना बदलाच्या अफवेमुळे झाल्याचे म्हटले आहे. अशोक चव्हाण हे तर आमचे नेते असून, त्यांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा लढवणार असल्याचेही चिखलीकर यांनी सांगितले.

नांदेड लोकसभेत तीन खासदार, चार आमदार असूनही भाजपचा उमेदवार चारी मुंड्या चित झाला. अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये मारलेली उडी चिखलीकरांसाठी धोक्याची ठरली. चव्हाणांचा भाजप प्रवेश नांदेडकरांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे नांदेडकरांनी ठरवून काँग्रेसच्या पारड्यात आपले वजन टाकले. परंतु हा पराभव भाजपच्या अजूनही गळी उतरलेला नाही. प्रताप चिखलीकरांनी जिल्हाभरात धन्यवाद सभा घेऊन आपल्या पराभवासाठी अशोक चव्हाणांनाच जबाबदार ठरवले. बेईमानांना सोडणार नाही, अशी गर्जनाही त्यांनी केली.

पक्षाकडून चव्हाणांची पाठराखण, चिखलीकर वार्‍यावर
प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेल्या आरोपांमुळे बेचैन झालेल्या अशोक चव्हाणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपले गार्‍हाणे नेले. लोकांनी मला मतदारसंघात फिरू दिले नाही. त्यात संपूर्ण देशभरातच मुस्लिम मते काँग्रेसकडे वळली. नांदेडातही तेच झाले. त्यामुळे चिखलीकरांच्या पराभवासाठी मी जबाबदार कसा? अशी वैâफियत चव्हाणांनी मांडली. त्यानंतर भाजपकडून चव्हाणांना पोटाशी धरण्यात आले आणि चिखलीकरांचीच हजामत करण्यात आली. पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण पराभवासाठी जबाबदार नाहीत, असे सांगण्याचे फर्मान चिखलीकरांना सोडण्यात आले.

अशोक चव्हाण हे माझे नेते
प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ‘अशोक चालिसा’चे वाचन केले. अशोक चव्हाण हे माझे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहोत आणि महायुतीच जिंकणार असल्याचा ५६ इंची दावाही चिखलीकरांनी केला. आपल्या पराभवाला अशोक चव्हाण नाही तर मनोज जरांगे यांचे आंदोलन जबाबदार असल्याचेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले. मुस्लिम मतेही मला मिळाली नाहीत. घटना बदलाच्या अफवेनेही मोठे काम केले असा दावा चिखलीकर यांनी केला. धन्यवाद सभेत मी जे काही बोललो त्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या, असेही चिखलीकर म्हणाले.

पत्रकार परिषदेलाही चव्हाण समर्थकांची दांडी
आजची पत्रकार परिषद ही भाजपकडून बोलावण्यात आलेली होती. या अधिकृत पत्रकार परिषदेलाही आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार तसेच आमदार राम पाटील रातोळीकर यांनी दांडी मारली. खासदार डॉ. अजित गोपछडेही गायब होते. खासदार अशोक चव्हाण हे शहरातच होते, परंतु त्यांनीही पक्षाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;