मणिपूर सचिवालयाला भीषण आग; आग लागली की लावली? हिंसाचार भडकला
गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून जवळपास 200 जणांचा मृत्यू झाला आहे, तर मोठय़ा प्रमाणावर जाळपोळ झाल्यानंतर हजारो लोक विस्थापित झाले आहेत. या आगीत घरे आणि सरकारी इमारती जळून खाक झाल्या.
गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचाराने होरपळणाऱया मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या सरकारी बंगल्याजवळील राज्य सचिवालय संकुलाच्या इमारतीमध्ये आज सायंकाळी आगीचा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, मणिपूरमध्ये प्रचंड हिंसाचार सुरू असताना सचिवालयाच्या इमारतीला आग लागल्याने आग लागली की लावली, याबाबत संशय व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत जिरीबाममधून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकावर कांगपोकपी जिह्यात संशयित सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला होता. पोलिसांनी सांगितले की, सकाळी 11.15 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे एक आगाऊ पथक, जे हिंसाचारग्रस्त जिरीबामच्या मार्गावर होते. त्यांनी के. के. सिनम गावाजवळ काही सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. दरम्यान, संशयित कुकी अतिरेक्यांनी आसामच्या सीमेला लागून असलेल्या जिह्यात विविध ठिकाणी अनेक हल्ले केले आहेत आणि आतापर्यंत कुकी अतिरेक्यांनी तीन पोलीस ठाणी, एका विशिष्ट वांशिक गटाच्या मोठय़ा संख्येने घरे जाळली आहेत. त्यामुळे ही आग लागली की लावली गेली असा संशय व्यक्त केला जात आहे.
पाच दिवस इंटरनेट बंद, आठ जिल्ह्यांत कर्फ्यू
– मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसेमध्ये सगळीकडे आगडोंब उसळल्याने सर्वसामान्य जनता दहशतीखाली आहे. त्यामुळे सरकारने लष्कराला पाचारण केले असून आठ जिह्यांत कर्फ्यू लागू केला आहे.
– पाच दिवस मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आठ हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले असून मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List