खरगेंचा हल्ला; मोदींकडे बहुमत नाही सरकार केव्हाही पडेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात स्थापन झालेले एनडीएचे सरकार हे मुळात चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आले आहे. मोदींकडे बहुमत नाही. त्यामुळे अल्पमतात असलेले हे सरकार केव्हाही पडेल, असा हल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज चढवला.
मोदींना जनादेश मिळालेला नाही. तरीसुद्धा त्यांनी सरकार स्थापन केले. ठीक आहे, हे सरकार नीट चालावे, देशासाठी काहीतरी चांगले काम या सरकारकडून व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. पण पंतप्रधान मोदींची अशी एक सवय आहे की, एखादी गोष्ट व्यवस्थित कधी चालू देत नाहीत. आम्ही आमच्या बाजूने देश मजबूत व्हावा यासाठी सरकारला निश्चितच सर्वतोपरी सहकार्य करू, असे खरगे पुढे म्हणाले.
भाजपचे तीन खासदार तृणमूलच्या संपर्कात
पश्चिम बंगालमधील भाजपचे तीन खासदार तृणमूल काँग्रेसच्या संपका&त आहेत. लवकरच ते आश्चर्याचा धक्का देतील आणि भाजपचे लोकसभेतील संख्याबळ 240वरून 237वर येईल. नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी केलेली ‘गठजोड’ फार काळ टिकणार नाही, असा दावा तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांनी केला आहे.
अहंकारामुळेच प्रभू रामांनी भाजपला 240वर रोखले – इंद्रेश कुमार
प्रभू राम हे सर्वांसोबत न्याय करतात. या निवडणुकीकडे पहा. ज्यांनी आजवर प्रभू रामाची भक्ती केली, ते अहंकारी बनत गेले. यामुळे प्रभू रामचंद्रांनी त्यांना 240 जागांवर रोखले. सर्वात मोठा पक्ष बनवलं, पण जितकी मते मिळायला हवी होती ती मिळाली नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपला खडेबोल सुनावले.
पराभवाला भाजप जबाबदार; मोदी-योगींना जनतेने नाकारले – राजभर
एनडीएत खटके उडू लागले आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी आज उत्तर प्रदेशातील जनतेने मोदी आणि योगींना नाकारल्याचा आरोप केला. निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला, पण इतरांनी पाळला नाही असे सांगत राजभर यांनी पराभवाला भाजपलाच जबाबदार धरले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List