धरणगावात दगडाने ठेचून युवकाची हत्या; गुन्हा दाखल
मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे दगडाने ठेचून 21 वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. मृत तरुण मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी मारेकर्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाचाही मदत घेतली आहे. शुक्रवारी सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास काहीजण शौचास जात असताना गावातील खंडोबा मंदिरानजीक खुल्या सभागृहात त्यांना रक्ताचा सडा आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलीस पाटलांच्या माध्यमातून शहर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक करुणाशील तायडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल वरारकर आदींसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना मंदिराजवळील सभागृहात रक्ताचा सडा व दक्षिणेस युवकाचा मृतदेह आढळून आला. मृतकाच्या खिशातील मोबाइलवर संपर्क केल्याने त्याची ओळख पटली. मृतकाचे नाव दीपक सुधाकर सोनोने (21, रा. डिडोळा, ता. मोताळा) असे आहे. या घटनेत मृतकाला दगडाने किंवा काठीने जबर मारहाण केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर खंडोबा मंदिरानजीकच्या सभागृहात उत्तरेकडून दक्षिणेकडे तब्बल 30 फूट मृतदेह मारेकर्यांनी फरफटत नेल्याने रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले. या घटनेत मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या त्या युवकाची हत्या आपल्या गावात कशी झाली? या प्रश्नामुळे धरणगावात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. बुलढाणा येथील श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List