कृष्णा खोऱ्यातील महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करू! अलमट्टी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली ग्वाही

कृष्णा खोऱ्यातील महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करू! अलमट्टी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली ग्वाही

कृष्णा खोऱयातील महापुराला रोखण्यासाठी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱयामधील (बॅरेज) पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करू, अशी ग्वाही अलमट्टी धरण प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांच्या सहकारी अभियंत्यांनी दिली.

कृष्णा खोऱयाला बसणारा महापुराचा तडाखा रोखण्यासाठी गेली पाच ते सहा वर्षे कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱयामधील पाणीसाठा आणि त्या दोन्हीही पाणीसाठय़ांचे परिचलन व्यवस्थित होत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळेच महापुराचा धोका उद्भवतो, असेही निष्कर्ष आहेत. या पार्श्वभूमीवर समितीतर्फे अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज यांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. यावेळी अलमट्टी प्रकल्पाचे (कर्नाटक जलसंपदा विभाग) अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांचे सहकारी अभियंते यांच्याबरोबर समितीच्या शिष्टमंडळाने व पत्रकारांनी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात महापूर येऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कृष्णा, वारणा व पंचगंगा या नद्यांना येणाऱया महापुराने या नद्यांच्या काठावर भीतीचे वातावरण असते. केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे पालन केल्यास आणि त्यानुसार सर्व धरणांचे परिचलन केल्यास महापूर नियंत्रित करता येऊ शकते, हे कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने दाखवून दिले आहे. महापूर रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल सातत्याने शासनासोबत व लोकांच्या चर्चेतून मार्ग निघावा यासाठी बरेच उपक्रम हाती घेतले आहेत. मात्र, अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि ऐन पावसाळ्यात त्यातून होणारा कमी विसर्ग, तसेच हिप्परगी बॅरेज (बंधारा)मधीलही पाणीसाठा याबद्दल अनेक मतमतांतरे होती. त्यामुळे कर्नाटकातील संबंधित अधिकाऱयांबरोबर चर्चा आणि प्रत्यक्ष अलमट्टी धरणाची पाहणीही सांगली, कोल्हापूर जिह्यातील पत्रकारांसमवेत कृती समितीच्या पदाधिकाऱयांनी केली.

कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांनी सदस्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच केंद्रीय जल आयोगाच्या निकषांचीही माहिती दिली. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिह्याप्रमाणेच कर्नाटकातील काही जिह्यांनाही महापुराचा दणका बसतो. त्यामुळे महापूर रोखण्यासाठी उपाययोजना अत्यावश्यक आहेत, असे अभ्यास गटाने कर्नाटकातील अधिकाऱयांना सांगितले. त्यांनीही आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे मान्य केले.

अलमट्टी धरणातील पाणीसाठा केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्हावा, असे अधिकाऱयांच्या निदर्शनास अभ्यास गटाने आणले. तेव्हा ते म्हणाले, आम्ही सीडब्ल्यूसीच्या गाईडलाईन पाळत नाही. त्या पाळल्या पाहिजेत असे कुठेही दिले गेले नाही. परंतु, त्या गाईडलाईन पाळणे आवश्यक आहे, असे अभ्यास गटाने सांगितले. यानंतर हिप्परगी बॅरेजचे दरवाजे जूनला उघडले पाहिजेत आणि ते 30 ऑगस्टपर्यंत खुले राहिले पाहिजेत, असे सांगितले. ते त्यांनी मान्य केले.

अलमट्टीचे अधीक्षक अभियंता रमणगौडा म्हणाले, कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला की कोयना धरणातून विसर्ग वाढवला जातो. त्यामुळे नद्यांना महापूर येतो. याबाबत कोयनेच्या पाटबंधारे अधिकाऱयांनी उपाययोजना करायला हव्यात. नद्यांमध्ये वाढती अतिक्रमणे, राष्ट्रीय महामार्ग यामुळे जलप्रवाहात येणारे अडथळे हेसुद्धा महापूर येण्यास कारणीभूत आहेत, असे त्यांनी सांगितले. राजापूर बंधाऱयातील फळ्या वेळेवर काढल्या जात नाहीत हेही महत्त्वाचे कारण आहे, असे ते म्हणाले. कमी दिवसात जास्त पडणारा पाऊस हेच महापुराचे मुख्य कारण असले तरी प्रशासनाकडेही त्यावर उपाययोजना आहेत. त्या कठोरपणे अमलात आणण्याची गरज आहे, असेही अभियंता रमणगौडा म्हणाले.

यावेळी कर्नाटक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. कुलकर्णी, रवी चंद्रगिरी, कुमार हचीना आदी उपस्थित होते. यावेळी कृष्णा महापूर समितीचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रदीप वायचळ, प्रभाकर केंगार, सुयोग हावळ, तसेच आंदोलन अंकुशचे आनंदा भातमारे, पोपट माळी, दत्तात्रय जगदाळे, बाळासाहेब भोगले यांनीही चर्चेत भाग घेतला.

उमेद वाढवणारी चर्चा

कृष्णा खोऱयातील महापूर रोखण्यासंदर्भात कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांबरोबर महाराष्ट्रातील एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या अभ्यास गटाने अशा पद्धतीची प्रथमच चर्चा केली असावी. कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांनीही या अभ्यास गटाबरोबर चर्चा केली. अशी घटना प्रथमच घडली असावी, असे मत निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांचा आम्हाला महापूर रोखण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आढळला. आता प्रत्यक्ष महापूर आलाच तर कसा अनुभव येतो ते पाहू, असेही दिवाण म्हणाले.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;