आषाढी वारी सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्नशील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

आषाढी वारी सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्नशील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार आहे. या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठय़ा प्रमाणात वारकरी येतात. पालखी सोहळ्यासोबत येणाऱया वारकऱयांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासन सूक्ष्म नियोजन करणार आहे. त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱया भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सुविधा तत्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱयांची (वर्ग-1) नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने बुधवारी (दि. 12) पंढरपुरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, सदाशिव पडदुणे, प्रियंका आंबेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, न. पा प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मख्याधिकारी प्रशांत जाधव, महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह मानाच्या पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, पालखी सोहळ्यासह येणाऱया वारकऱयांना पालखी मार्गावर कोणतेही अडचण येऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रस्त्यांची, उड्डाण पुलांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. पालखीतळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुरुमीकरण करण्यात यावे. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे. महिला भाविकांसाठी वाळवंटात चेंजिंग रूमबाबत पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी करून जागा निश्चिती करून उत्तम दर्जाच्या चेंजिंग रूमची उपलब्धता करावी. पालखीतळांसाठी व रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत भूसंपादनाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच सोलापूर जिह्यात पालखीसोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी मार्गावरील व तळांवरील सर्व कामे पूर्ण होतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

दिंडय़ांच्या वाहनांना पासची सोय

जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे म्हणाले, पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासोबत येणाऱया दिंडय़ांच्या वाहनांना वाहनपासची उपलब्धता करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंदिर समितीचे पूर्ण सहकार्य मिळणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून पालखी सोहळ्यास व वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;