चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर हा अभिनेता झाला उपमुख्यमंत्री
TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आज आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. चंद्राबाबू नायडूंसोबत अनेक नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आंध्र प्रदेश विधानसभेत एनडीएने एकतर्फी विजय मिळवला आहे. तेलुगू देसम पक्षाच्या नेतृत्वात एनडीएने बहुमत मिळवल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांची त्यांच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली. पवन कल्याण, नायडू यांचा मुलगा नारा लोकेश आणि अनेक मंत्र्यांना राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी शपथ दिली. जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि अभिनेता पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन करताना म्हटले की, ‘मुख्यमंत्री नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर सर्वांचे अभिनंदन ज्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. एनडीए सरकार जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करून आंध्र प्रदेश राज्याला समृद्धीच्या नव्या उंचीवर नेईल, असा माझा ठाम विश्वास आहे.
कोण कोण होते उपलस्थित
राज्यपालांनी चंद्राबाबू नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, भारताचे माजी सरन्यायाधीश एनव्ही रमना आणि सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार ग्रहण केल्यावर चंद्राबाबू नायडू यांना मिठी मारली. पंतप्रधानांनी नंतर तेलुगू मेगास्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण यांची भेट घेतली आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, तमिळ सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांच्याशी मंचावर संवाद साधला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांनी कुप्पम येथून तर पवन कल्याण यांनी पिथापुरम येथून विजय मिळवलाय. मंत्रिमंडळात पवन कल्याण यांच्या पक्षाला तीन तर भाजपला एक जागा मिळाली आहे.
टीडीपीला मोठं यश
चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात तेलगू देसम पक्षाने विधानसभा निवडणुकीत राज्यातील 175 पैकी 135 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने निवडणुकीत २१ जागा जिंकल्या असून भाजपने आठ जागा जिंकल्या आहेत. जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष YSRCP फक्त 11 जागा जिंकू शकला. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत टीडीपी, जनसेना आणि भाजपने युती करून निवडणूक लढवली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List