लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झाल्या नाहीत. डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे दिली नाही. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जादा दराने खरेदी झाली. याला विरोध केला म्हणून कृषी आयुक्तांना बाजूला काढले. भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेसने आज राज्यपालांकडे केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी नाना पटोले म्हणाले, राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱयाला सरसकट कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱयांना एकरी चार लाख रुपये द्यावेत. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या शिष्टमंडळात नसीम खान, यशोमती ठाकूर, खासदार शोभा बच्छाव, वसंतराव चव्हाण, बळवंत वानखेडे व अन्य उपस्थित होते.
राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत आहे, पण महायुती सरकारला गांभीर्य नाही. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने खते, बियाण्यांची अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोटय़वधी रुपयांची खरेदी झाली. ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी.
– नाना पटोले,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List