तुला मानलं भाऊ! पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या सौरभसाठी सूर्याची खास पोस्ट
T20 विश्वचषक 2024 चा 11 वा सामना 6 जून रोजी अमेरिका आणि पाकिस्तान या दोन संघात खेळला गेला. डलासमधील ग्रँड प्रेयरी मैदानावर खेळल्या गेलेल्या या सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्थानचा दारुण पराभव केला. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता. तर अमेरिकेने या स्पर्धेतील दुसरा सामना खेळला.
दरम्यान, या सामन्यात अमेरिकेचा मराठमोळा गोलंदाज सौरभ नेत्रावलकरने शानदार गोलंदाजी केली. सौरभ नेत्रावलकरने पाकिस्तानच्या पहिल्या डावात 4.50 च्या इकॉनॉमीने 18 धावांत 2 बळी घेतले. यानंतर, सुपर ओव्हरमध्येही त्याने 9 च्या इकॉनॉमी रेटसह 9 धावा देत पाकिस्तानचा एक खेळाडू बाद केला. सौरभची हिच शानदार खेळी पाहून सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर एक खास स्टोरी पोस्ट केली आहे.

सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सौरभचा आणि हरमीत सिंग यांचा कालच्या सामन्यातील एक फोटो टाकला आहे. सोबतच त्या दोन्ही खेळाडूंना टॅग करत एक छोटा संदेश दिला आहे. सूर्यकुमारने लिहिले की, “हरमीत सिंग पाजी आराम से…#जादू”. यानंतर त्यांनी मराठीत लिहिलं की, ‘सौरभ नेत्रावळकर तुला मानला भाऊ’. ‘तुमच्यासाठी मी खूप आनंदी आहे’, असे सूर्यकुमारने त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
कोण आहे सौरभ नेत्रावलकर
सौरभ नेत्रावलकर हा हिंदुस्थानी वंशाचा अमेरिकन क्रिकेटपटू आहे. सौरभ मुळचा मुंबईचा असून तो पेशाने इंजिनिअर आहे. सौरभ हा हिंदुस्थानच्या 2010 मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप संघाचा भाग होता. यानंतर मुंबईकडून रणजी ट्रॉफीही तो खेळला आहे. मात्र आता सौरभ अमेरिकेकडून क्रिकेट खेळतो. आत्तापर्यंत सौरभ नेत्रावलकरने अमेरिकेसाठी 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 77 सामन्यांमध्ये त्याने 4.45 च्या इकॉनॉमीने 102 विकेट घेतल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List