मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू; मराठा समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका, जरांगे यांचा इशारा

मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू; मराठा समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका, जरांगे यांचा इशारा

राजकारणाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सरकारने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून आंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले. पोलीस तसेच प्रशासनाने उपोषण न करण्याची केलेली विनंती जरांगे यांनी धुडकावून लावली. कायद्याने मला उपोषण करण्याचा अधिकार दिला आहे, असेही त्यांनी बजावले. दरम्यान, उपोषणाला परवानगी नाकारण्याचे षड्यंत्र फडणवीसांचे असल्याचा स्पष्ट आरोपही त्यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आजपासून आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले. गावकर्‍यांनी केलेला विरोध, पोलीस तसेच प्रशासनाने केलेली विनंती पाहता उपोषणाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अंबडच्या प्रभारी तहसीलदार धनश्री भालचिम यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. परंतु जरांगे यांनी प्रशासनाची विनंती फेटाळली. सकाळीच ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपोषणाला परवानगी नाकारण्याचे षड्यंत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे असल्याचा आरोप केला. सरकारने परवानगी नाकारली तरी मी उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे जरांगे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांनाही विरोध झालाच होता. लोकशाही मार्गाने न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणे हा आपला अधिकार असल्याचेही त्यांनी बजावून सांगितले.

आमदारांच्या भूमिकेवर आमचे लक्ष
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला कोणकोणते आमदार पाठिंबा देतात याकडे आमचे बारीक लक्ष आहे. आमदारांनी मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव आणावा, असेही मनोज जरांगे म्हणाले. जे आमदार मराठा आरक्षणावर भूमिका घेणार नाहीत त्यांना मराठा समाज कायमचे घरी पाठवणार असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मोदी गरिबांचे ऐकत नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करून उपयोग नाही. मोदींच्या कानावर गरिबांचा आवाज पडत नाही. गरिबांची गरज त्यांना केवळ सत्ता मिळवण्यापुरती होती. आता त्यांना गरिबांची गरज उरली नाही, असा टोलाही मनोज जरांगे यांनी लगावला.

तातडीने विशेष सभा बोलावली
मनोज जरांगे यांनी उपोषणासाठी ग्रामसभेची परवानगी घेतली नसल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले होते. त्यामुळे उपोषण सुरू करण्यापूर्वी तातडीने आंतरवाली सराटी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सभा बोलावण्यात आली. ‘मनोज जरांगे यांचे उपोषण गावात होऊ द्यायचे की नाही’ असा एका ओळीचा ठराव मांडण्यात आला. या सभेत सभेच्या बाजूने पाच, तर सभेच्या विरोधात पाच अशी समान मते पडली. त्यामुळे सरपंचांना मत देण्यास सांगण्यात आले. सरपंचांनी सभेच्या बाजूने मतदान केल्याचे ग्रामसेवक एस. जे. शेख यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या पथकाने केली जरांगे पाटलांची तपासणी
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी डॉक्टरांच्या पथकाने मनोज जरांगे यांची तपासणी केली. जरांगे यांच्या नाडीचे ठोके ८२, तर रक्तदाब १०४/७० असून रक्तातील साखरेचे प्रमाण ८९ असल्याचे डॉ.दीपक सोनवणे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;