कंगना भिरभिरली, चंदिगड विमानतळावर कानफटवले
चंदिगड विमानतळावर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत हिला सीआयएसएफच्या महिला जवानाने कानफटवल्याची घटना घडली असून शेतकरीविरोधी भूमिका घेतल्याने माझा राग व्यक्त केल्याचे या महिलेने सांगितले. दरम्यान, कानफटात बसताच कंगना भिरभिरली आणि तिने आदळआपट करत तक्रार केली. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.
कंगना राणावत मंडीतून भाजपकडून निवडून आली आहे. दिल्लीला परतण्यासाठी कंगना गुरुवारी चंदिगड विमानतळावर आली होती. सुरक्षा तपासणी झाल्यानंतर बोर्डिंगसाठी जात असताना अचानक तिथे तैनात सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने पंगनावर हल्ला चढवला. कुलविंदरने कंगनाला कानशिलात लगावत आपला राग व्यक्त केला. कंगनासोबत असलेल्या मयंक मथुर या व्यक्तीने कुलविंदरवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत कुलविंदरला ताब्यात घेतले. विमानतळाच्या कर्टन एरियात कुलविंदरने वाद घातला. त्यातून तिने मला कानशिलात मारले, असा दावा कंगनाने केला आहे. सीआयएसएफकडून घटनेची चौकशी करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दरम्यान, कुलविंदरला निलंबित करण्यात आले असून याप्रकरणी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे.
शेतकरी आंदोलनाच्या अपमानाचा बदला
शंभर रुपये मिळतात म्हणून शेतकरी आंदोलनात महिला बसतात, असे कंगना म्हणाली होती. जेव्हा तिने ही बडबड केली तेव्हा माझी आईही आंदोलनात उतरली होती. या अपमानाचा बदला मी घेतल्याचे कुलविंदरने कॅमेऱ्यासमोर सांगितले. कंगनाने पंजाब-हरयाणातील शेतकरी आंदोलनाला खलिस्तानींचे आंदोलन म्हटले होते. त्यामुळेही तिच्याविरोधात शेतकऱयांमध्ये तीव्र भावना होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List