लोकल प्रवासात झोप लागली आणि तरुणाने आयफोन लांबवला
बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे काम आटोपून ती शेवटच्या कसारा लोकलने घरी निघाली. पण माटुंगा सोडताच तिला झोप लागली आणि लोकल कसारा येथील यार्डात गेली. त्या तरुणीवर लक्ष ठेवून असलेल्या तरुणाने संधी साधत तिचा आयफोन आणि सोन्याची चैन काढून पळू लागला. पण कल्याण रेल्वे पोलिसांमुळे त्याची चोरी पकडली गेली.
श्वेता शिंदे (23) ही तरुणी दादर येथे शेफचे काम करते. बुधवारी रात्री काम आटोपल्यानंतर तिने दादर स्थानकात शेवटची कसारा लोकल पकडली. महिलांऐवजी ती जनरल डब्ब्यात बसली. माटुंगा स्थानक सोडल्यानंतर तिला झोप लागली. तिला ठाणे स्थानकात उतरायचे होते. पण गाढ झोप लागल्याने ती पुढे निघून गेली. लोकल कसाऱयाला पोहचून यार्डात गेली तरी तिला जाग आली नाही. दरम्यान याच लोकलमध्ये मस्जिद बंदर स्थानकात आशीष जॉन मकासरे (20) हा तरुण चढला होता. तो पण श्वेता होती त्याच डब्ब्यात होता. त्यामुळे त्याचे तिच्यावर लक्ष होते. त्याला भांडुपला उतरायचे होते. पण तो जाणीवपूर्वक उतरला नाही. डबा खाली होत असल्याचे व तरुणी गाढ झोपली असल्याचे हेरून तोही डब्यात बसून राहिला. अखेर यार्डात लोकल थांबल्यानंतर आशीषने तिचा आयफोन व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. हा ऐवज घेऊन त्याने लोकलमधून उडी टाकली. पण नेमका त्या वेळी गस्तीवर असलेल्या कल्याण रेल्वे पोलिसांच्या तो नजरेस पडला. पोलिसांनी अडवून विचारपूस केली असता त्याची भंबेरी उडाली. त्यामुळे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे मोबाईल व चेन सापडली.
लोकलमध्ये तरुणी सापडली
आशीषचे बोलणे संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी लोकल तपासली तेव्हा जनरलच्या एका डब्यात श्वेता झोपलेल्या अवस्थेत सापडली. त्यामुळे तिला उठवून विचारपूस करता आशीषकडे मिळालेला मोबाईल व सोन्याची चेन तिची असल्याचे स्पष्ट झाले. कल्याण रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा किमती ऐवज चोरीला जाण्यापासून रोखता आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List