हल्ल्याच्या घटनेनंतर निलेश लंकेंनी घेतली राहुल झावरेंची भेट, कार्यकर्त्यांना केले आवाहन
खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने त्यांना मोठी इजा झाली नाही. मात्र त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर खासदार निलेश लंके यांनी आज नगर येथे झावरे यांची भेट घेऊन त्यांनी तब्बेतीची विचारपूस केली.
पारनेर या ठिकाणी राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना नगरच्या सुरभी या खाजगी रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. त्यांच्या हातावर आणि गळ्यापाशी जखमा असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलेले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, माजी महापौर भगवान फुलसौंदर माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, योगीराज गाडे यांच्यासह पारनेर येथील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा झावरे यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.
खासदार लंके यांनी राहुल झवरे यांच्या तब्बेतीची विचारपूस केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “झावरे यांना आज पांढरे या ठिकाणी मारहाण झालेली आहे. त्यांच्या डोक्याला व पोटाला मोठ्या प्रमाणामध्ये मार लागलेला आहे. राजकारण हा एक खेळ असून तुम्हाला विजय सुद्धा पचवता आला पाहिजे, तसेच पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे. आज जो हल्ला झाला तो पारनेर येथील गुंडांनी केलेला आहे. पोलिसांना त्यांची नावे माहिती आहेत. ज्या गुंडांनी मारहाण केली त्यांची या अगोदरची भाषणे पहा त्यांचे वक्तव्य पहा. आम्हाला कोणीच काही करू शकत नाहीत, असे वक्तव्य ते करत होते. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जमीन बळकवण्याचे, अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. कुणीही वक्तव्य करू नये की जेणेकरून समाजाला व प्रशासनाला त्रास होईल याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे व शांतता राखली गेली पाहिजे. गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. झावरे यांचा जबाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल होईल,” असे यावेळी निलेश लंके म्हणाते. तसेच जनतेने व कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा कोणतीही वक्तव्य करू नये शांतता ठेवावी असे आवाहन लंके यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List