Lok Sabha Election 2024: अश्रूंची झाली फुले! चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांचा दणदणीत विजय; मुनगंटीवार यांचा पराभव
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने राज्यात प्राबल्य सिद्ध केले आहे. विदर्भातही महाविकास आघाडीने मुसंडी मारली असून चंद्रपूरमध्येही काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला आहे.
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 586107 मते मिळाली असून त्या 215709 मतांनी आघाडीवर आहेत. तर मुनगंटीवार यांना 370398 मते मिळाली आहेत. आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, पक्षाच्या आदेशामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत, असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले होते. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत होता. आता काँग्रेसने या मतदारसंघात बाजी मारली असून भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा दारूण पराभव झाला आहे.
दरम्यान, आधीच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दल मतदार संघात सहानुभूतीचं वातावरण होतं. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर धानोरकर नागपूर विमानतळावर आल्या होत्या. त्यांनी आपल्या मुलाला कवेत घेतलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले होते. मात्र त्यांच्या या अश्रूंवरून सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी ‘डोळ्यातील अश्रू बघून फक्त सहानुभितीवर मतदान कराल तर पाच वर्ष तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सतर्क करतोय’, अशा शब्दात त्यांनी टिका केली होती.
त्यांच्या या विधानानं जनभावनांचा आणि धानोरकरांच्या अश्रूंचा अनादर केल्याची भावना जनतेत निर्माण झाली होती. अखेर प्रतिभा धानोरकर यांच्या विजयातून मुनगंटीवार यांच्या विधानाचा जनतेने समाचार घेतल्याचं बोललं जात आहे.
चंद्रपूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधील ४ व यवतमाळ जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) यांच्यात प्रमुख लढत होत आहे.
– सुधीर मुनगंटीवार २७ हजार मतांनी पिछाडीवर, प्रतिभा धानोरकर आघाडीवर
– प्रतिभा धानोरकर ८ हजार मतांनी आघाडीवर
– काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर तर भाजप उमेदवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
तेरावी लोकसभा १९९९-२००४ नरेश पुगलीया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हंसराज अहिर भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- सुरेश नारायण धानोरकर काँग्रेस
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List