पाणी जपून वापरा, फक्त 7 टक्के पाणी शिल्लक; मुंबईला आता राखीव कोटय़ातून पाणी, उद्यापासून 10 टक्के पाणीकपात
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांनी तळ गाठला असून केवळ 7.31 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना अप्पर वैतरणातील 91 हजार 300 आणि भातसा धरणातील 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर राखीव कोटय़ातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणीसाठा कमी असल्यामुळे मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईला वर्षभर पाणीसाठा सुरळीत सुरू राहण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी 1447363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. यानुसार वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब लागल्याने तलाव तळ गाठत आहे. त्यामुळे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाते. 2022 मध्ये 17 ऑक्टोबरपर्यंत मान्सून बरसत होता. मात्र 2023 मध्ये 29 सप्टेंबर रोजी पाऊस पडणे बंद झाले. यामुळे दरवर्षी वाढीव 5 ते 7 टक्के जादा मिळणारे पाणी यावर्षी मिळालेच नाही. पण 1 ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर मात्र सुरू राहिला. यामुळे यावर्षी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईवर जलसंकट निर्माण झाले आहे. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱया अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव पाणी वापरण्याची परवानगी मिळाल्याने तुर्तास मोठे संकट टळले असले तरी जूनमध्ये तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध पाणीसाठा
(दशलक्ष लिटरमध्ये)
मोडकसागर – 20074
तानसा – 37445
मध्य वैतरणा – 19321
भातसा – 21321
विहार – 5466
तुळशी – 2236
तीन वर्षांची 3 जूनची स्थिती
2024 – 105862 दशलक्ष लिटर – 7.31 टक्के
2023 – 174118 दशलक्ष लिटर – 12.03 टक्के
2022 – 240315 दशलक्ष लिटर – 16.60 टक्के
राखीव कोटय़ाने तारले
तलावांत सद्यस्थितीत फक्त 105862 दशलक्ष लिटर पाणी आहे. मुंबईला दररोज होणारा 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी केवळ 27 दिवसांना पुरणारे आहे.
मात्र राखीव कोटय़ातील 228300 दशलक्ष लिटर पाणी वापरण्याची परवानगी मिळाली असल्याने मुंबईच्या पाणीपुरवठय़ाची किमान दोन महिने राखीव कोटय़ावर मदार राहणार आहे.
दरम्यान, 30 मेपासून 5 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून आता 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात केली जाणार असल्याचे जल विभागाने स्पष्ट केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List