संभाव्य पूरस्थितीबाबत पंचगंगेत आपत्तिव्यवस्थापन प्रशिक्षण
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्तिव्यवस्थापन प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहेत. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱयावर सुरू असलेल्या तीनदिवसीय प्रात्याक्षिक ठिकाणी भेट देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आढावा घेतला.
आपत्ती, आणीबाणी, प्रथमोपचार, धोका, आपत्तीचे प्रकार, आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम श्वासोच्छवास आदींबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिह्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी तेथे जाऊन मदतकार्य करून जीवितहानी टाळू शकतात. यावेळी पाण्यात बुडणाऱयाला वाचविणे, तरंगणाऱया दोरीने बुडणाऱयाला वाचविणे, बोटीने शोधमोहीम, बोट उलटल्यास बचाव मोहीम, स्ट्रेचर, अग्निशमन दल आदी प्रात्याक्षिक घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बोटीने प्रवास करून राजाराम बंधारा परिसरातील पंचगंगा नदी घाटाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी म्हणाले, ‘जिह्यात आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, जर पूरस्थिती उद्भवली, तर त्याचा सामना करण्यासाठी 70 पेक्षा जास्त बोट आहेत. एक हजार लाईफ जॅकेट, रेस्क्यूसाठी आवश्यक सर्व साधनसामुग्री, दोन हजार आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक तथा आपदा मित्र तयार आहेत. यावर्षी मान्सून चांगला येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जर कुठे पूरस्थिती निर्माण झाली, तर प्रशासन सज्ज असून, वेळोवेळी प्रशासन, स्वयंसेवक आणि नागरिक यांच्या मदतीने आपत्तीविषयक मोहिमा हाती घेतल्या जातील, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List