सातारा तालुका पोलिसांची जबरदस्त कामगिरी; साताऱयातील ‘हिट ऍण्ड रन’मधील आरोपीला 12 तासांत अटक
साताऱयातील ‘हिट ऍण्ड रन’ प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळालेल्या वाहनचालकाला 12 तासांत अटक करण्याची कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे व त्यांच्या टीमने तपासाची चक्रे फिरवून अपघात करून गेलेले वाहन व चालक यांना पकडून पोलीस ठाण्यात हजर केले.
कुंवर बहादूर नवलकिशोर सिंह (वय 26, अमोर, कानपूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहराजवळ लिंबखिंड परिसरात शुक्रवारी सकाळी अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे लिंब येथील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उैर्फ बाबू खादगे यांचा मृत्यू झाला व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या होत्या. याच परिवारातील एका युवकाचा दोन-तीन वर्षांपूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. पण त्या अपघातातील वाहनाचा आजही तपास लागला नाही. त्यामुळे या अपघातानंतर खादगे यांचे नातेवाईक व ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला. अपघात करून गेलेल्या वाहनचालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आरोपीला शोधून काढण्याच्या सूचना सातारा तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांना दिल्या होत्या. निरीक्षक तांबे यांनी अपघात करून गेलेल्या वाहनाच्या शोधासाठी यंत्रणा कामाला लावली. घटनास्थळापासून अगदी एक्स्प्रेस वेपर्यंत प्रमुख ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून अपघात करून जाणाऱया वाहनाची ओळख पटली. सीएनजी गॅसचा पुरवठा करणारा टाटा कंपनीचा तामिळनाडू पासिंगचा (टीएन-88, के-1282) ट्रक निघाला. त्यानंतर अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने या वाहनाचा माग काढण्यात आला. शुक्रवारी रात्री लिंब येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच पुण्याजवळ महामार्गावर पोलिसांनी हा मालट्रक पकडून वाहनचालक कुंवर बहादूर नवलकिशोर सिंह (वय 26, रा. अमोर, कानपूर, उत्तर प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या. पहाटे वाहन व वाहनचालक यांना सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणले गेले.
सातारा तालुका पोलिसांची ही कामगिरी सर्वांनाच अचंबित करणारी ठरली आहे. कारण बेदरकार वाहन चालवून अनेक निष्पापांचे बळी घेणारे असे अपघात घडतात; पण बहुतेक प्रकरणांत तपास लागत नाही. ही प्रकरणे ‘हिट ऍण्ड रन’च्या यादीत सामावून जातात; पण अपघात करून महामार्गावरील वाहनांच्या अमर्याद गर्दीत मिसळून गेलेल्या वाहनाचा सातारा तालुका पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत तपास केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. या कामगिरीमुळे सातारा पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List