Lok Sabha Election 2024 : नगर-शिर्डीत मतदान केंद्र सज्ज; एक हजारहून अधिक कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मंगळवार दि.4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागपूर, नगर येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.
मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. नगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. 1 येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.3 मध्ये होणार आहे. नगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात शेवगाव पाथर्डी, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपुर व नेवासा असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी 14 टेबल लावण्यात आले आहेत.
विधानसभा मतदार संघ निहाय असणाऱ्या व मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, संगमनेर 278 मतदान केंद्र 20 फेऱ्या, शिर्डी 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या, कोपरगाव 272 मतदान केंद्र 20 फेऱ्या, श्रीरामपुर 311 मतदान केंद्र 23 फेऱ्या तर नेवासा 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या होणार आहेत. नगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव पाथर्डी 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, राहुरी 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, पारनेर 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, नगर शहर 288 मतदान केंद्र 21 फेऱ्या, श्रीगोंदा 345 मतदान केंद्र 25 फेऱ्या तर कर्जत जामखेड 356 मतदान केंद्र 26 फेऱ्या होणार आहेत.
मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रावर कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे निगराणी होत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहचवली जाणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List