आंबेगाव येथे घरफोडी, महिलेला मारहाण करत सोन्याचे दागिने चोरले
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथे तीन अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत तीन महिलांना मारहाण करून अंदाजे दोन ते सव्वा दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. ही घटना शुक्रवार दि. 31 मे रोजी पहाटे दोन अडीच च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे अवसरी बुद्रुक परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवसरी बुद्रुक येथील हिंगेमळा परिसरात शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास एकनाथ विष्णू हिंगे यांच्या घरी तीन चोरट्यांनी भर लोकवस्तीत घरफोडी केली. एकनाथ हिंगे यांची दोन्ही मुले सचिन हिंगे व संदीप हिंगे हे मंचर येथील एका कंपनीत कामाला असल्यामुळे रात्रीच्या वेळेस ते कामाला गेले होते, याचा फायदा घेऊन, पाळत राखून तीन चोरट्यांपैकी एका चोरट्याने घराची भिंत व कौल याच्या फटी मधून घरात प्रवेश करून आतून घराची कडी उघडली. त्यानंतर घरात झोपलेल्या ज्येष्ठ महिला कुंदा एकनाथ हिंगे यांच्या कानातील सोन्याची कुडी ओरबडण्याच्या प्रयत्नात त्यांचा कान तुटला आहे व त्यांचे गळ्यातील सोन्याच्या वाट्या काढून घेतल्या आहेत हे घेताना चोरट्यांनी त्यांना काठीने मारहाण केली आहे. बाजूच्या रूममध्ये झोपलेल्या अर्चना सचिन हिंगे, सारिका संदीप हिंगे या दोन्ही सुनांना चोरट्यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील सोन्याच्या वाट्या काढून घेतल्या घरात असणाऱ्या लोखंडी, लाकडी कपाटाची उचकापाचकी करून त्यात काही मिळाले नाही तर अर्चना हिंगे यांच्या लहान मुलाला मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनी स्वतःहून त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने काढून दिले.
या घटनेत हिंगे कुटुंबीयांचे सुमारे दोन ते सव्वा दोन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे.व घराची बाहेरील कड्या लाऊन चोरटे अंधारात पळाले. या घटनेची माहिती कळतच आजूबाजूच्या नागरिकांनी मदती साठी धाव घेतली परंतु तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले होते. दरम्यान रात्री अडीचच्या सुमारास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सोमशेखर शेटे व कर्मचारी, पोलीस पाटील माधुरी जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली व परिसराची पाहणी करून पुन्हा पहाटे पाचच्या सुमारास भेट दिली. दरम्यान मागील तीन महिन्यांपासून पोलिसांची रात्रीची गस्त बंद असल्याने चोरटे त्याचा फायदा घेत आहेत, अनेक वेळा नागरिकांनी रात्रीची गस्ती चालू करावी याबाबत मागणी केली असतानाही पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे, हा सर्व परिसर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये मोडत असल्याने या परिसरात रात्रीची बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत असल्याने घराबाहेर मदतीसाठी नागरिक पडत नाही. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाने सावध होऊन रात्रीची गस्त पुन्हा चालू करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List