विक्रोळीत म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळला; 2 वृद्धांचा मृत्यू
विक्रोळी पूर्वमधील कन्नमवारनगरात म्हाडाच्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघा वृद्धांचा मृत्यू झाला असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
कन्नमवारनगर 1, रमाबाई आंबेडकर उद्यानाजवळील बिल्डिंग नंबर 40, गुरुकृपा सोसायटी या इमारतीचा भाग सायंकाळी 6.50च्या सुमारास अचानक कोसळला. तिसऱया मजल्याचा स्लॅब दुसऱया मजल्यावर, दुसऱया मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर आणि त्या धक्क्याने पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून तळाला आला. या विचित्र दुर्घटनेत शरद म्हसळेकर (75) आणि सुरेश म्हादळकर (77) हे दोन वृद्ध ढिगाऱयाखाली दबले गेले. त्यांना ढिगाऱयातून बाहेर काढून जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिवसैनिक देवदूत बनून मदतीला धावले
दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्यासह विभागातील शिवसैनिक देवदूत बनून मदतीला धावले. या इमारतीत 12 कुटुंबे राहत होती. त्या सर्वांना कन्नवारनगरमधीलच म्हाडा संक्रमण शिबारात हलवण्यात आले. तिथे या सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या कुटुंबांना सर्व प्रकारची मदत सुनील राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. घटना घडल्यापासून शिवसैनिकांचे अविश्रांत मदतकार्य सुरू आहे.
चमकोगिरी करणाऱया कोटेचा यांना महिलांचा घेराव
दुर्घटना घडल्यानंतर चार तासांनी भाजपचे मिहीर कोटेचा उगवले. म्हाडा अधिकाऱयांना शिवीगाळ करत त्यांनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चाव्या दिल्याच कशा, असे त्यांनी अधिकाऱयांना विचारले. इतकी भीषण घटना घडली असताना त्याचे गांभीर्य न पाळता राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱया कोटेचा यांच्या स्टंटबाजी अंगलट आली. संतप्त महिलांनी कोटेचा यांना घेराव घातला व प्रसंग काय आणि तुम्ही राजकारण काय करताय, असा सवाल करत चांगलेच फैलावर घेतले. त्यामुळे कोटेचा यांना काढता पाय घ्यावा लागला.
‘त्या’ अधिकाऱयांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पुनर्विकासाची फाईल गेल्या सहा महिन्यांपासून म्हाडाकडे पडून आहे. याबाबत सातत्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संयुक्त कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्यांनी फाईलवर निर्णय घेतला नाही. त्यांची ढिलाईच या दुर्घटनेला कारणीभूत असून जे अधिकारी या घटनेला जबाबदार असतील त्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List