पुण्यातून 37 आयटी कंपन्या OUT! राज्य सरकारने तरुणांचं भवितव्य संकटात आणलं; सुप्रिया सुळे संतप्त
देशातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठे आयटी हब म्हणून हिंजवडी येथील आयटी पार्कचा उल्लेख केला जातो. मात्र वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळून 37 कंपन्या हिंजवडी आयटी पार्कमधून बाहेर गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
हिंजवडी येथे असणाऱ्या आयटी पार्कमुळे पुणे जिल्ह्याची जागतिक पातळीवर ओळख निर्माण झाली. पण सततच्या ट्रॅफीक जॅममुळे ही ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. कारण याच ट्रॅफीकच्या जाचाला कंटाळून एक दोन नव्हे तर तब्बल 37 कंपन्या राज्याबाहेर गेल्या आहेत. या 37 कंपन्यांव्यतिरीक्त आणखी काही कंपन्या पुणे सोडून बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार एकामागून एक बाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटर (X) अकाउंटवरून राज्य सरकारवर निशाना साधला. “महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार एकामागून एक बाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यापूर्वीही महत्त्वाचे उद्योग बाहेर गेले, तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतला गेला. परंतु सरकारला याबाबतीत लक्ष घालायला वेळ नाही. आता पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून 37 कंपन्या बाहेर गेल्याचे समोर आले आहे,” असे म्हणत राज्य सरकारला तरुणांच्या रोजगाराची चिंता नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
“एक उद्योग बाहेर जातो तेव्हा त्यासोबत रोजगार आणि तरुणांचे भवितव्य देखील संकटात येते. महाराष्ट्रातील तरुणाई रोजगाराच्या शोधासाठी पायपीट करीत असून या परिस्थितीला उद्योग टिकवून ठेवण्याबाबत निष्काळजी असणारे हे शासन कारणीभूत आहे,” असे म्हणत तरुणांचं भविष्य राज्य सरकारने संकटात आणल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार एकामागून एक बाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यापुर्वीही महत्वाचे उद्योग बाहेर गेले, तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतला गेला. परंतु सरकारला याबाबतीत लक्ष घालायला वेळ नाही. आता पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्या… pic.twitter.com/RlRkRp6jqw
— Supriya Sule (@supriya_sule) May 30, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List