मोदींच्या ध्यानधारणेसाठी 2000 हून अधिक पोलीस, NSG कमांडो तैनात; खासगी बोटी आणि पर्यटकांना प्रवेश बंद
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दोन दिवस कन्याकुमारीत राहणार आहेत. यावेळी ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक खडकावर (Vivekananda Rock Memorial) ध्यान करतील. पीएम मोदी कन्याकुमारीमध्ये जवळपास 45 तास राहणार असून विशेष बाब म्हणजे पीएम मोदी कन्याकुमारीमध्ये त्याच ठिकाणी बसून ध्यान करणार आहेत, जिथे स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं. त्यामुळेच या जागेला स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ विवेकानंद रॉक मेमोरियल असं नाव देण्यात आलं आहे.
या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर पूर्व आणि पश्चिम घाट एकत्र येतात. हिंद महासागर आणि अरबी समुद्र जिथे मिळतात ते हे ठिकाण आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यासाठी कन्याकुमारी आणि विशेषत: विवेकानंद रॉक मेमोरियलजवळ कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधान मोदींच्या या मुक्कामासाठी कन्याकुमारीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी 2000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जोपर्यंत पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये थांबतील, तोपर्यंत कोणत्याही पर्यटकाला तेथे जाऊ दिले जाणार नाही, असं सांगण्यात येत आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडो तैनात केल्याचीही बातमी आहे.
हिंदुस्थानचं तटरक्षक दल आणि नौदलही या गोष्टींवर बारीक नजर ठेवणार आहेत. पोलीस अधीक्षक ई सुंदरावथनम आणि तिरुनेलवेली रेंजचे डीआयजी प्रवेश कुमार यांनी राज्य अतिथीगृह, बोट जेटी, हेलिपॅड आणि रॉक स्मारक येथील सुरक्षा व्यवस्थांची तपासणी केली.
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार गुरुवार ते शनिवार पर्यंत, समुद्रकिनारा पर्यटक आणि खासगी बोटींना फेरी मारण्याची परवानगी दिली जाणार नाही.
हेलिपॅडवर सराव हेलिकॉप्टर लँडिंग झालं असून, पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने तेथे पोहोचणार आहेत.
हा आहे पंतप्रधानांचा संपूर्ण कार्यक्रम
पीएम मोदींच्या कार्यक्रमाबाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी 30 मे रोजी दुपारी कन्याकुमारी येथे पोहोचतील. येथून ते विवेकानंद रॉक मेमोरिअल येथे जातील. 30 मेच्या संध्याकाळपासून ते 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत ते येथील ध्यानमंडपममध्ये ध्यानधारणा करतील. पीएम मोदी त्यांच्या या भेटीदरम्यान श्री भगवती अम्मान मंदिरालाही भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान तेथे पूजाअचर्ना देखील करणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी 1 जूनला संध्याकाळी दिल्लीला रवाना होऊ शकतात. मात्र, पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी तमिळ कवी थिरुवल्लुवर यांच्या पुतळ्यालाही भेट देऊ शकतात, अशीही बातमी समोर येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List