राशीनमधील कत्तलखान्यातून 46 गोवंश जनावरांची सुटका, 700 किलो गोमांस जप्त; नगर गुन्हे शाखा पथकाची कारवाई
गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे राशीनमधील अनधिकृत कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई करत 46 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली. तर कत्तलखान्यातून 700 किलो गोमांस जप्त केले.
कर्जत तालुक्यातील राशीन येथील अनधिकृत कत्तलखान्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल सुरू आहे. अशी माहिती गोरक्षक महादेव जठार यांना मिळाली. त्यांनी पुण्यातील मानद पशुकल्याण अधिकारी ऋषिकेश भागवत यांना माहिती दिली. भागवत यांनी तातडीने नगर येथे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती दिली.
त्यानंतर पोलीस पथक घेऊन महादेव जठार व ऋषिकेश भागवत हे मंगळवारी पहाटे राशीन येथे आले. त्यानंतर राशीनमधील कुरेशी मोहल्ला येथे छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये त्यांना शहबाज आयुब कुरेशी, सोहेल कुरेशी व सुलतान कुरेशी (तिघे रा. राशीन) यांच्या घरामध्ये 46 गोवंश जातीची जनावरे आढळून आली. यामध्ये गावरान गाईची 11 वासरे, 18 जर्सी जातीच्या गाई व 17 जर्सी गाईची वासरे बांधलेली आढळली. याशिवाय तेथे 710 किलो गोमांस आढळून आले. याशिवाय काही म्हशीदेखील आढळून आल्या. पोलिसांनी या सर्व 46 जनावरांची सुटका केली. सर्व जनावरे टेम्पो व पिकअप व आयशर टेम्पोमधून कर्जत पोलीस स्टेशनला आणण्यात आली.
ऋषिकेश भागवत यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये शहाबाद आयुब कुरेशी, सोहेल कुरेशी व सुलतान कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राशीन पोलिसांनी तत्काळ कत्तलखाना पाडावा – भागवत
राशीन येथील कुरेशी मोहल्ला येथे अनेक दिवसांपासून अनधिकृत कत्तलखाना सुरू आहे. हा कत्तलखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना असूनही त्यांनी कारवाई केली नाही. हा अनधिकृत कत्तलखाना राशिन पोलिसांनी तत्काळ पाडावा; अन्यथा राशीन पोलिसांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऋषिकेश भागवत यांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List