फोफसंडीत दिवस फक्त सहा ते सात तासांचा! दोन ते अडीच तासांनी उशिरा होतो सूर्यादय, तर सूर्यास्तही लवकर होतो
निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनदेखील महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण असलेली ठिकाणे आहेत. महाराष्ट्रात छोटी-छोटी गावे आहेत, जी निसर्गाच्या कुशीत वसली असून, जणू काही पृथ्वीवरचे स्वर्गच आहेत. अशाच प्रकारचे एक वैशिष्टय़पूर्ण गाव आहे. या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. मात्र, सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या ठिकाणी सूर्योदय दोन ते अडीच तास उशिरा होतो व सूर्यास्तदेखील दोन ते अडीच तास लवकर होतो. म्हणजेच या ठिकाणी एकूण दिवसाचा कालावधी फक्त सहा ते सात तासांचा आहे. या अनोख्या अशा गावाचे नाव फोफसंडी असून, ते नगर जिह्यात वसले आहे.
महाराष्ट्र म्हटला म्हणजे निसर्गाची समृद्ध खाण आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तसेच नगर जिल्हासुद्धा वेगवेगळ्या वैशिष्टय़ांमुळे आता ओळखला जाऊ लागला आहे. नगर हा धार्मिकदृष्टय़ा या राज्याच्या नकाशावर अग्रेसर असलेला जिल्हा व त्यातच ‘साखरसम्राट जिल्हा’ म्हणून त्याची ओळख आहे. पर्यटनामध्येही जिल्हा नावारूपाला येत आहे. फोफसंडी हे गावही येथील निसर्गाच्या चमत्कारामुळे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
नगर जिह्यात सह्याद्रीच्या अत्युच्च डोंगररांगांमध्ये हे सुंदर असे टुमदार गाव वसलेले आहे. ज्या कालावधीमध्ये हिंदुस्थानवर इंग्रजांची सत्ता होती, तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. त्याला जेव्हा सुट्टी असायची, तेव्हा तो आराम करण्यासाठी या गावामध्ये येत असे. तेव्हापासून या गावाला ‘फॉफसंडे’ हे नाव पडले व त्यानंतर या शब्दाचा अपभ्रंश झाला व त्यातून आताचे ‘फोफसंडी’ हे नाव या गावाला मिळाले.
हे एक छोटेसे गाव असून, या ठिकाणची लोकसंख्या हजार ते बाराशे इतकी आहे. या गावामध्ये प्रामुख्याने 12 आडनावांचे लोक राहतात. प्रामुख्याने या गावामध्ये कोंडार, भद्रिके, पिचड, उंबरे, गोरे आदी आडनावांचे लोक मोठय़ा प्रमाणावर राहतात. येथील लोकांचा व्यवसाय हा शेती असून, पावसाळ्याच्या कालावधीतील चार महिने शेतीतून पीक घेतले जाते व उरलेल्या कालावधीमध्ये येथील लोक कामधंद्यानिमित्त पुणे किंवा ठाणे जिह्यामध्ये जातात.
या गावातील शेतकरी भात, वरई व नागलीसारखी पिके मोठय़ा प्रमाणावर घेतात. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या गावात मात्र शेतीला पाण्याची खूप वानवा असून, पावसाच्या कालावधीतच फक्त या ठिकाणी शेती होते व इतर कालावधीत पाणी नसल्याने शेती करता येत नाही. पावसाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतो व मोठमोठे धबधबेदेखील या ठिकाणी प्रवाहित होतात. या ठिकाणी असलेल्या धबधब्यांमध्ये फोफसंडीचा धबधबा खूपच प्रसिद्ध आहे.
फोफसंडी गावाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या गावाच्या हद्दीतूनच मांडवी नदीचा उगम झालेला आहे. या ठिकाणी ज्या गुहा आहेत, यामध्ये मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती, असे म्हटले जाते व यावरूनच या नदीचे नाव ‘मांडवी’ पडले. निसर्गवैशिष्टय़ामुळे फोफसंडी गावात दोन ते अडीच तास उशिरा होणारा सूर्यादय आणि दोन ते अडीच तास लवकर होणारा सूर्यास्त यामुळे सध्या हे गाव चर्चेत आहे. त्यामुळे येथील लोकांचा कामाचा कालावधी आणि दिनक्रमही इतरांपेक्षा कमी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List