मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची अंघोळ घालू; महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचा इशारा
राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून, कृषी पंपांना जलमापक यंत्र (पाणी मीटर) बसविले जाणार आहेत. आधीच उत्पादनखर्चाचा मेळ बसत नसल्याने शेती संकटात आली आहे. आता शासनाच्या या निर्णयांमुळे शेतकरी कमालीचा अडचणीत आला आहे. त्यामुळे हे निर्णय तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने पुणे-बंगळुरू महामार्गावरील पुलाची शिरोलीजवळ आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांनी भेट देऊन सरकारने याबाबत 6 जूनला बैठकीचे पत्र दिले. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने येत्या 6 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम देत ‘रास्ता रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. सरकारने हे निर्णय मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालू, असा इशाराही फेडरेशनच्या वतीने देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या वतीने सांगली, कोल्हापूर व सातारा जिह्यातील शेतकऱयांच्या वतीने वाढीव पाणीपट्टीविरोधात आणि मीटर बसविण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात आज पुणे-बंगळुरू महामार्गावरील पुलाची शिरोली येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापूर जिह्यांतील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
…मग ‘एफआरपी’मध्ये तोडमोड का? राजू शेट्टी यांचा सवाल
एकीकडे सरकार शेतकऱयांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहे, तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दहापट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार ‘एफआरपी’मध्ये मोडतोड करून तुकडय़ाने शेतकऱयांना ऊस बिले अदा करीत आहे. याबाबत सरकार मूग गिळून गप्प बसले असून, पाणीपट्टी मात्र एकरकमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोटय़ातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावेत,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.
शासनाला मीटर बसविणारा नवीन कॉण्ट्रक्टर भेटला असेल म्हणून हे नवीन फॅड – आमदार सतेज पाटील
‘महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने सुरू असलेले ‘रास्ता रोको’ आंदोलन आम्ही तात्पुरते स्थगित करीत आहोत. आचारसंहितेमुळे हा निर्णय होऊ शकणार नाही. यामुळे सरकारला 6 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत. 6 तारखेनंतर निर्णय न झाल्यास पुन्हा लढा उभा करावा लागेल,’ असा इशारा देत आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘शासनाला मीटर बसविणारा नवीन कॉण्ट्रक्टर भेटला असेल, म्हणून हे नवीन फॅड शेतकऱयांवर लादले जात आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
शेतकऱयांना पैसे देण्यासाठी कारखानेही सकारात्मक
दरम्यान, ‘साखर कारखानदार एकरकमी ‘एफआरपी’संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाली होती. राजू शेट्टी हे नेहमी शेतकऱयांच्या पाठीशी उभे राहणारे नेते आहेत. मात्र, साखरेसाठी बँकांकडून जे आपण लोन घेतो, त्याच्या व्याजाचा भुर्दंड किती होतो, याप्रमाणे प्रत्येक कारखान्याचा हिशेब करावा. शेवटी कारखानेदेखील शेतकऱयांचेच असून, शेतकऱयांना चार पैसे देण्यासाठी आम्ही सर्वच सकारात्मक आहोत,’ असेही सतेज पाटील म्हणाले. तसेच ‘सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला पालकमंत्री गैरहजर असतात. यामुळे आम्ही स्वतः दौरा करून अहवाल तयार करून काँग्रेस श्रेष्ठाRना पाठविणार आहोत. तेथून तो सरकारला मिळेल,’ असेही सतेज पाटील म्हणाले
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List