अकरावी पॉलिटेक्निक आणि व्यावसायिक प्रवेशात मराठा विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षणाचा लाभ
शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये होणाऱया विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या वैधानिक आरक्षणाबरोबच मराठा आरक्षणाचा लभा मिळणार आहे. अकरावी, पॉलिटेक्निक आणि सीईटी सेल अंतर्गत व्यावसायिक प्रवेशातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशात यंदा मराठा आरक्षणासाठी 10 टक्के राखीव असणार आहेत.
राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी यापुढे होणाऱया नोकर भरती प्रक्रियेत आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये 26 फेब्रुवारी 2024पासून 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यानुसार आता विविध प्रवेश प्रक्रियेत यंदा मराठा आरक्षणाद्वारे प्रवेश होणार आहेत. राज्य सरकारचा 2024चा महाराष्ट्र अधिनियम क्रामांक-16 नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम- 2024 हा 26 फेब्रुवारीपासून अमलात आला आहे. ‘सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग’ असा नवीन वर्ग निर्माण करण्यात आला आहे. या वर्गात मराठा समाजाचा समावेश करत 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक कधी?
संविधानिक आरक्षण सोडून उपलब्ध जागांतील 10 टक्के जागा या एसईबीसी या प्रवर्गाला दिल्या आहेत. त्यामुळे प्रवेशाचे स्ट्रक्चर बदलावे लागले आहे. दहावी, बारावीचे निकाल जरी वेळेपूर्वी जाहीर झाले असले तरी या बदलामुळे प्रवेशाला उशीर झाला आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येत आहे. मात्र दहावीचा निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप प्रवेशाचा दुसरा टप्पा सुरू झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांकडून प्रवेशाचे तारखानिहाय वेळापत्रक कधी जाहीर होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अद्याप अकरावीच्या उपलब्ध जागांचा तपशीलदेखील जाहीर केलेला नाही. त्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने वर्तवली आहे. सर्व महाविद्यालयांतील जागांची नोंदणी झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया यंदा सुरू होईल, अशी माहिती अकरावीच्या प्रवेश यंत्रणेतील एका अधिकाऱयाने दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List