सरकारच्या आर्थिक धोरणांवर बोलतच राहणार; अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा पुनरुच्चार
मी सरकारमध्ये आहे किंवा नाही याची मला पर्वा नाही, सरकारच्या आर्थिक धोरणांवर बोलतच राहणार असा पुनरुच्चार भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर आणि अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी केला. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली परखड मते मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱयांदा पंतप्रधान बनो अथवा न बनो, हिंदुस्थान आपल्या आर्थिक धोरणांनुसार पुढे चालत राहील. या निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या आर्थिक धोरणांवर काहीच परिणाम होणार नाही. मात्र, मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात तिजोरीतून पैसे खर्च करायला हवे होते, पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यायला हवे होते, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारने पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नव्या सरकारला यावर लक्ष द्यावे लागेल, पायाभूत सुविधांच्या दर्जाकडेही पाहावे लागेल. तसेच याचा फायदा केवळ मोठया कंपन्यांनाच मिळतो परंतु, लहान कंपन्या आणि छोटय़ा व्यापाऱयांनाही याचा फायदा व्हायला हवा, असेही ते म्हणाले.
मी राजकारणात येऊ नये असे माझ्या कुटुंबातील लोकांना वाटते. राजकारणात येण्यापेक्षा मला शक्य होईल तेवढे मार्गदर्शन करायला आवडेल असे रघुराम राजन म्हणाले. मी याआधीही वारंवार हेच सांगितले आहे.
राहुल गांधी स्मार्ट
राहुल गांधी यांच्याबद्दल काय वाटते असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी अत्यंत स्मार्ट आणि समजुतदार तसेच बहाद्दर नेते आहेत. त्यांच्या आजी आणि वडिलांची हत्या करण्यात आली होती. अशा स्थितीत कुणीही अंथरुणात लपून बसले असते. पण, त्यांच्यात विचार करण्याची आणि सर्व समजून घेण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यांच्याकडे नेतृत्वगुण आहे. कोविडमध्येही आपल्याला पूर्ण तयारीनिशी उतरावे लागेल हेच त्यांनी सातत्याने सांगितले. दुसऱया लाटेत काँग्रेसने आपल्या सर्व सभा रद्द केल्याची आठवण रघुराम राजन यांनी करून दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List