मोदी आणि शहांचे सरकार झोपा काढतेय… हिंदुस्थानी सीमेवर चीनने चार वर्षांत वसवली 624 गावं!
हिंदुस्थानच्या सीमेवर दुर्गम भागात चीनने चार वर्षांत तब्बल 624 गावे वसवल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला असून त्या भागात चीन आपल्या सैन्याचे जाळे पसरवत असल्याने धोका वाढला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असतानाही सरकारला त्याचा मागमूसही कसा नाही? मोदी-शहांचे सरकार झोपा काढतेय का, असा सवाल यावरून देशप्रेमी जनता विचारत आहे.
वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅण्ड स्ट्रटेजिक स्टडीजचा अहवाल 16 मे रोजी प्रसिद्ध झाला. त्यात चीनने वसवलेल्या गावांच्या सॅटेलाईट इमेजही प्रसारित केल्या आहेत.
हिमालयाच्या दुर्गम भागात गावांची निर्मिती
2018 ते 2022 या चार वर्षांत चीनने या भागात शियाओकांग (सर्व सुविधांनी सज्ज) गावांची उभारणी केली आहे आणि आणखीही गावांची निर्मिती केली जात आहे. दुर्गम आणि निर्जन भागात ही गावे वसवली जात आहेत. हिंदुस्थानसाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
अरुणाचल प्रदेशजवळ चार वेगवेगळ्या ठिकाणी चीनने गावे वसवली आहेत. दुहेरी वापर करता येईल, अशा पद्धतीने ही मॉडेल गावे वसवली गेली आहेत. यात याराओ तसेच जुआंगनान, माजिदुनकुन आणि कुइकियोंगमेनमध्ये तर सैन्यासाठी लागणाऱया सुविधाही उभारण्यात आल्याची गंभीर बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे.
हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीन सातत्याने दावा सांगत आला आहे. त्याबाबत हिंदुस्थानकडून ठोस भूमिका घेण्यात आली नसताना चीनचे धाडस वाढतच चालले आहे. त्यातूनच चीनकडून सीमेवर गावे वसवण्याचे पाऊल उचलले गेले आहे.
याराओजवळ गेल्या वर्षी चीनने पक्का रस्ता आणि दोन हेलिपॅडची उभारणी केली. याराओ 3 हजार 900 मीटर उंचीवर आहे. अत्यंत प्रतिकूल हवामान असतानाही चीनने तिथे इमारती उभारल्या आहेत.
ग्रे झोनमध्ये ही गावे वसवण्यात आली आहेत. या गावांमध्ये छुप्या पद्धतीने सैनिक तैनात ठेवले जाऊ शकतात, असा धोका संरक्षण तज्ञांनी व्यक्त केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List