मोदी हरले तर देशाच्या आर्थिक धोरणांची दिशा…, रघुराम राजन यांचं मोठं विधान
Lok Sabha Election 2024 नंतर सत्ताबदल झाल्यास देशाच्या आर्थिक धोरणांचं काय होणार यावर उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर तसंच विविध क्षेत्रातील अभ्यासकांकडून सुरू आहेत. सर्वसामान्य जनता मात्र कुणाचं खरं मानावं अशा संभ्रमावस्थेत आहे. अशातच आता हिंदुस्थानच्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले काय किंवा नाही झाले नाही तरी तरीही हिंदुस्थान आपले आर्थिक धोरण आहे तसेच कायम ठेवण्याची शक्यता आहे, असं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.
‘हिंदुस्थानच्या धोरणात बरंच सातत्य पाहायला मिळतं’, असं राजन यांनी मंगळवारी ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘जे सरकार येईल ते आधीच्या सरकारच्या काळातील बऱ्याच चांगल्या गोष्टी घेईल आणि ते पुढे चालू ठेवेल’, असं त्यांनी सांगितलं.
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये फायनान्सचे प्राध्यापक असलेले रघुराम राजन हाँगकाँगमध्ये यूबीएस एशियन इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्सच्या वेळी बोलत होते.
नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर लवकरच अर्थसंकल्प जाहीर करेल, ज्यामध्ये ‘इतर काय बदल करावे लागतील हे पाहण्याचा प्रयत्न करताना सध्या सुरू असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थानातील सहा आठवड्यांच्या सात टप्प्यातील निवडणुका 1 जून रोजी संपत आहेत, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपला पुन्हा केंद्रात 400 पार जागा मिळतील असा दावा ते करत असले तरी विरोधक मात्र भाजपला 200 ते 250 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत आहेत.
राजन यांनी सल्ला दिला आहे की, येणाऱ्या सरकारनं देशातील पायाभूत सुविधांवर खर्च करणे आवश्यक आहे. तसेच पुढे जाण्यासाठी हिंदुस्थानने आपल्या पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि गुंतवणुकीचा फायदा केवळ मोठ्या औद्योगिक कंपन्यांना होणार नाही तर लहान उद्योगांना देखील याचा फायदा मिळणे आवश्यक असल्याचं राजन म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List