तो माझ्या आयुष्यातून गेलाच नाही..; हृदयभंगाच्या अनुभवाविषयी जान्हवी कपूर व्यक्त
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ती विविध मुलाखतीत देत आहे. यातील एका मुलाखतीत जान्हवीने तिचा हृदयभंगाचा अनुभव सांगितला. आयुष्यात असा अनुभव फक्त एकदाच घेतल्याचं तिने कबुल केलं. मात्र हृदयभंग हा केवळ रोमँटिकच असतोच असं नाही, हे तिने स्पष्ट केलं. जान्हवीने 2018 मध्ये बॉलिवूड पदार्पणाच्या काही महिने आधी आई श्रीदेवी यांना गमावलं होतं. आईचं निधन ही घटनासुद्धा एकाप्रकारे हृदयभंग झाल्यासारखंच होतं, असं जान्हवी म्हणाली.
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये जान्हवीने सांगितलं, “मला असं वाटत नाही की हृदयभंग हा केवळ रोमँटिक नात्यातच असू शकतो. तो इतर अनेक गोष्टींबद्दलही असू शकतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीकडून खूप अपेक्षा असते आणि त्याच्याशी तुम्ही भावनिकदृष्ट्या जोडलेले असता, तेव्हासुद्धा तुमचा हृदयभंग होऊ शकतो. इतक्या अपेक्षा असताना गोष्टी मनासारख्या घडल्या नाही, तर तेव्हा जी मनस्थिती असते ती हृदयभंग झाल्यासारखीच असते. मी माझ्या करिअरमध्ये असा अनुभव घेतला. रोमँटिकदृष्ट्याही माझा हृदयभंग झाला आहे. पण माझ्या मते आईच्या निधनानंतर मी सर्वाधिक खचले होते.”
“रोमँटिक नात्याबद्दल विचारत असाल तर त्या हृदयभंगाच्या अनुभवातून मी बाहेर पडले. कारण ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून कधी गेलीच नाही आणि त्यामुळे मला त्यातून बाहेर येण्यास मदत झाली. काही गोष्टी का घडल्या याविषयी जेव्हा तुमच्या डोक्यात स्पष्टता असते, तेव्हा नातं संपुष्टात आणणंच योग्य असतं”, असं तिने पुढे सांगितलं. जान्हवी ही शिखर पहाडियाला डेट करत असल्याची चर्चा आहे. तिने स्वत: अप्रत्यक्षपणे अनेकदा त्याच्यासोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. शिखर हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मुलगा आहे.
“मी 15-16 वर्षांची असल्यापासून तो माझ्या आयुष्यात आहे. माझ्या मते माझी स्वप्नं ही नेहमीच त्याची स्वप्नं राहिली आहेत आणि त्याची स्वप्नं ही नेहमीच माझी आहेत. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. जणू आम्ही एकमेकांनाच लहानाचं मोठं केलंय, अशा पद्धतीने आम्ही एकमेकांची साथ देतो”, असं जान्हवी शिखरबद्दल म्हणाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List