गांधी हा विचार असल्याने त्याला भाजपप्रमाणे मार्केटिंगची गरज नाही; रोहित पवार यांचा मोदींवर हल्लाबोल
जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा विचार जगाला देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा होत आहे. मोदींच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. तसेच या वक्तव्याने महात्मा गांधी यांचा अवमान झाला आहे, अशी भावनाही काहीजण व्यक्त करत आहेत. मोदी यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिकास्त्र सोडले.
महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनवण्यात आला, त्यानंतर जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झाले. त्याआधी त्यांना कोणीही ओळखत नव्हते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यांनी याबाबतचे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच महात्मा गांधींचे विचार जगभरात पोहोचवण्यासाठी 75 वर्षांत काहीही प्रयत्न झाले नाहीत. आपण त्या विचारांचे मार्केटिंग करण्यात कमी पडलो, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानावर एक पोस्ट करत रोहित पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
#गांधी_विचार म्हणून ज्यांचे विचार जगभर अजरामर आहेत, ज्यांनी जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा विचार आणि उपोषण व सत्याग्रहाचं अस्त्र दिलं, ज्यांचे आदर्श म्हणून जगभर पुतळे उभारले गेले त्या ‘महात्मा गांधीजींना जगात कुणी ओळखत नव्हतं,’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 29, 2024
रोहित पवार यांनी पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, #गांधी_विचार म्हणून ज्यांचे विचार जगभर अजरामर आहेत, ज्यांनी जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा विचार आणि उपोषण व सत्याग्रहाचे अस्त्र दिले, ज्यांचे आदर्श म्हणून जगभर पुतळे उभारले गेले त्या ‘महात्मा गांधीजींना जगात कुणी ओळखत नव्हतं,’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य साफ चुकीचं आहे…
ही टेलिप्रॉम्प्टरची चूक आहे की वैचारिक दारिद्र्य असलेल्या अधिकाऱ्यांकडून घेतलेल्या ब्रीफची, हे कळत नाही. तसं असेल तर अशा अधिकाऱ्यांना मोदी साहेबांनी तातडीने दूर केलं पाहीजे. जेणेकरुन चुकीच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानपदाची गरीमा कमी होणार नाही आणि राष्ट्रपुरुषाबाबत चुकीची माहितीही प्रसारीत होणार नाही. शिवाय गांधी हा विचार असल्याने त्याला भाजपप्रमाणे मार्केटिंगची गरज नसते.. हा विचार लोक स्वतःहूनच स्वीकारत असतात, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List