शिवसेनेच्या दणक्यानंतर सोमय्या नाल्याची सफाई सुरू; 100 टक्के नालेसफाईची केली पोलखोल
मुंबईत पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर सर्व नाल्यांमध्ये 100 टक्के नालेसफाई झाली असल्याचा मुंबई महापालिका आणि भाजपच्या एका नेत्याने केलेल्या दाव्याची घाटकोपरमधील शिवसेना पदाधिकाऱयांनी पोलखोल केली. विद्याविहारच्या सोमय्या नाल्यात साचलेला तुडुंब कचरा आणि गाळ प्रत्यक्ष महापालिकेच्या ‘एन’ विभागाच्या अधिकाऱयांना शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी दाखवल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. सोमय्या नाल्याची गंभीर स्थिती बघून आजपासून या नाल्याची सफाई सुरू करण्यात आली आहे. पावसाळय़ात दुर्घटना होऊ नये, रहिवाशांच्या जिवाशी खेळ होऊ नये यासाठी जागरुक असलेल्या शिवसेना पदाधिकाऱयांचे स्थानिकांनी मनापासून आभार मानले आहेत.
मुंबईत नालेसफाई योग्य प्रकारे झाली नाही आणि अशा वेळी अतिवृष्टी झाली तर तुंबलेल्या नाल्यातील पाणी नाल्याशेजारी राहत असलेल्या रहिवाशांच्या घरात शिरण्याचा धोका असतो. नालेसफाई नीट न झाल्यास रोगराईचा धोकाही संभवतो. मात्र मुंबईतील सर्व नाल्यांची 100 टक्के साफसफाई झाली आहे, असा दावा पालिकेने केला होता, मात्र विद्याविहार पूर्वमधील मोहननगर येथील सोमय्या नाला तुडुंब भरलेला होता. या नाल्याची पालिकेने साफसफाई करून स्थानिकांना दिलासा द्यावा, अशी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख सुरेश पाटील, उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, सहसमन्व्यक प्रसाद कामतेकर, विलास लिगाडे, काँग्रेस पक्षाचे कमलेश कपासी, सचिन भांगे, चंद्रकांत हळदणकर यांच्यासह शिवसैनिकांनी केली होती.
हजारो रहिवाशांच्या जिवाला असलेला धोका टळला
सोमय्या नाल्याची साफसफाई न झाल्यास चित्तरंजन कॉलनी, एमआयजी कॉलनी, शास्त्राrनगर, जवाहरनगर, मोहननगर, राजावाडी सीबीसी महानगरपालिका शाळा, राजावाडी रुग्णालय, सोमय्या कॉलेज परिसरात पाणी तुंबण्याचा धोका होता. या नाल्यात आधीच कचरा असल्यामुळे भिंतदेखील नाल्यात कोसळली होती. त्यासाठी या नाल्याची तत्काळ साफसफाई करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली होती. नालेसफाईमुळे परिसरातील हजारो रहिवाशांच्या जिवाला असलेला धोका टळला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List