उष्माघाताने वानराचा मृत्यू, संपूर्ण गाव हळहळलं; सन्मानपूर्वक केला अंत्यविधी
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे नागरिकांना तसेच वन्य प्राण्यांना सुद्धा उष्माघाताचा फटका बसत आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये एका वानराला उष्णतेचा फटका बसला असून उष्माघातने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे एका वानराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. दोन-तीन दिवसांपासून वानर आजारी होते. त्याच्यावर उपचार सुद्धा करण्यात आले. मात्र वानराच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. वानराच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांनी सुद्धा हळहळ व्यक्त केली. तसेच वानराची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावात असणाऱ्या हनुमान मंदिराच्या समोर वानराचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी गावातील लहान, थोर, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील बबन देवा व राजू देवा यांनी मंत्रांचा उच्चार करत वानराचा अंत्यविधी केला.
गावातील ज्येष्ठ नागरिक सुभाष लांडे, दिनकरराव बडधे, विठ्ठलराव उगलमुगले, शिवाजी ढगे, बाळू काका वाघ, मनोज बडधे, एकनाथ ढगे, महादेव उगलमुगले, माजी सरपंच जालिंदर वाकडे, भीमराज उगलमुगले, पत्रकार रवींद्र उगलमुगले, अशोक सोनवणे, चंद्रकांत वाघ, भास्कर वाघ आदी टाळकरी व भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या वानरावर पुढील विधी करण्यात येणार असल्याचा निर्णय सुद्धा गावकऱ्यांनी घेतला आहे. उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे वन्य जनावरे मानवी वस्तीत पाण्यासाठी फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसाठी वनविभागाने पाण्याची सोय करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List