चिमुरडा बिबट्याला कुत्रा समजला; आई-वडिलांचा थरकाप उडाला…
काळ आला होता पण वेळ आली नव्हती…देव तारी त्याला कोण मारी अशा म्हणी आपण नेहमी वापरतो. मात्र, याची प्रचिती अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथे एका शेतमजूर दांपत्याला आली. त्यांच्या दोन वर्षाच्या लहान मुलाने बिबट्याला कुत्रा समजून आई-वडिलांना भू भू आहे म्हणून दाखवले. मुलाने दाखवलेल्या दिशेकडे बघताच आई-वडिलांचा भीतीने थरकाप उडाला. कारण मुलगा दाखवत होता त्या दिशेला कुत्रा नसून चक्क बिबट्या होता आणि दोन वर्षांचा चिमुरडा बिबट्यालाच कुत्रा समजला होता. ते शेतमजूर दांपत्याला समजताच त्यांनी मुलाला उचलून पळ काढला. बिबट्यापासून मुलाचा आणि स्वतःचा जीव वाचल्याबाबत त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
उन्हाळ्यामुळे सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी काढण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास अवसरी खुर्द येथील कोसरपट्टी या परिसरात विकास टेमकर यांच्या शेतामध्ये दोन शेतमजूर (पती-पत्नी) बाजरीची तोडणी करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षाचा लहान मुलगाही होता. बाजरी तोडणी करत असताना लहान मुलाने वडिलांना सांगितले मागे भूभू आहे. वडिलांनी मागे वळून पाहिले असता त्या ठिकाणी बिबट्याचा बछडा व मादी होती. बिबट्याला बघताच त्यांचा भीतीने थरकाप उडाला. मात्र, प्रसंगावधान दाखवत त्यांनी आपल्या लहान मुलाला उचलून पळ काढला. सुरक्षित ठिकाणी आल्यावर विकास टेमकर यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळाच तात्काळ वन विभागाचे वनरक्षक रईस मोमीन, वनरक्षक सी. एस. शिवचरण, बिबट रेस्क्यू सदस्य मनोज तळेकर, मिलिंद टेमकर यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. या घटनास्थळाच्या ठिकाणी चारही बाजूने उसाचे क्षेत्र व मधोमध बाजरीचे क्षेत्र आहे. वनरक्षक रईस मोमीन यांनी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरा लावला आहे. रईस मोमीन, सी. एस. शिवचरण यांनी या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून एकटे फिरू नये व शेतीची कामे करताना लहान मुलांना घरीच ठेवावे. घरी ठेवणे शक्य नसेल तर शेतीची कामे करताना त्यांना आपल्या नजरेसमोरच ठेवावे. मुलांना भडक आणइ गडद रंगाचे कपडे घालू नये. परिसरात फिरताना सावधगिरी बाळगावी, अशा सूचना केल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List