नगर: भिंगारमध्ये पहिल्यांदाच फुलले महाराष्ट्राचे राज्यफूल ‘ताम्हण’
भिंगार येथील शुक्लेश्वरकॉलनी येथे महाराष्ट्राचे राज्यफुल म्हणून मानचिन्ह असलेले ताम्हण भरभरून फुलले आहे. निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भिंगारमधील हा पहिलाच ताम्हणवृक्ष आहे. अनेक भागांमध्ये हा वृक्ष अतिशय दुर्मिळ होत चालल्याने अनेकजण याबाबत अनभिज्ञ आहेत. म्हणूनच या वृक्षाचे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतुने गेल्या चार वर्षांपूर्वी या समुहातर्फे ‘राज्यफुल आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या उपमांतर्गत, एक हजार पेक्षा अधिक ताम्हण वृक्षाच्या रोपांचे मोफत वाटप विविध जिल्हा परिषद शाळा व जोपासना करू इच्छिणार्या नागरिकांना केले होते. या उपक्रमान्वये जिल्ह्यात ठिकठिकाणी लावलेले हे ताम्हणची रोपे गेल्या दोन वर्षांपासून आता छान बहरू लागली आहेत. यापैकी भिंगार या ठिकाणी स्वदिप आर्टस व सुयश क्लासेसच्या बाहेर श्री. स्वदिप खराडे व श्री. सर्जेराव तोडमल यांनी लावलेल्या ताम्हण वृक्षाला अतिशय सुंदर बहर आला आहे. या ठिकाणी हे राज्यफुल पाहण्यासाठी दररोज अनेक नागरिक, विद्यार्थी व निसर्ग छायाचित्रकार सातत्याने भेटी देत आहेत.
‘प्राईड ऑफ इंडिया’ या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणार्या या वृक्षाचे शास्त्रीय नाव लॅगेरस्टोमिया स्पेसिओसा असे आहे. मराठी नाव ताम्हण असून याला जारूळ, बोंडारा, बुंद्रा या स्थानिक नावांनीही ओळखले जाते.
मेंदीच्या कुळातील असलेला हा वृक्ष मध्यम आकाराचा असून तो दाट सावली देतो. तो आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या सर्व खंडांतील जंगलांमध्ये आढळून येतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्यांच्या काठाने व विदर्भातही तो अधून मधून दिसत असला तरी इतरत्र अनेक भागात तो दुर्मिळच होत चालला आहे. हा फुले देणारा वृक्ष असून याला साधारणपणे 1 मेच्या म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या काळात फुले येत असल्याने याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणून घोषित करण्याचा निर्णय झाला.
ताम्हणाच्या फूलाला गुलाबीसर-जांभळ्या अशा आकर्षक व वैविध्यपूर्ण रंगछटा असतात. झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो. महाराष्ट्राचे मानचिन्ह, दिसायला आकर्षक, पर्यांवरणातील महत्त्व व लागवडीला सोप्या असलेल्या या वृक्षाचे रोपण सर्वांनी रस्त्याच्या दुतर्फा अथवा मोकळ्याजागी करून निसर्गसंवर्धनास हातभार लावायला हवा.
ताम्हण हा वृक्ष केवळ महाराष्ट्राचे राज्यफुलवृक्ष नसून त्याला पर्यावरणातही खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा वृक्ष अनेक प्रकारचे पक्षी, मधमाशा, फुलपाखरे व इतर कीटक यांचा अधिवास असल्याने जैवविविधता वाढवणे व जोपासण्याचे महत्वाचे कार्य करतो, म्हणूनच या वृक्षाचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे, अशी माहिती निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List