Breaking: कीर्ती व्यासच्या निर्घृण हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
अभिनेता फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानीच्या ‘बी-ब्लंट’ सलूनची फायनान्स मॅनेजर कीर्ती व्यासची निर्घृण हत्या करणाऱ्या सिद्धेश ताम्हणकर व खुशी साहज्वानी या दोघांना मंगळवारी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सोमवारी या दोघांना दोषी ठरवण्यात आलं होतं आणि मंगळवारी शिक्षा सुनावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे खाडीत फेकलेला कीर्तीचा मृतदेह अजून सापडलेला नाही.
ग्रॅण्ट रोड येथील 28 वर्षांची कीर्ती व्यास अंधेरीतील ‘बी-ब्लंट’ सलूनमध्ये कामाला होती. ती 16 मार्च 2018पासून बेपत्ता होती. दोन महिन्यांनंतर तिच्या हत्याकांडाचे गूढ उकलले. मुंबई क्राईम ब्रँचने 5 मे 2018 रोजी सिद्धेश व खुशीला अटक केली. दोघांनी कीर्तीचे अपहरण केले व कारमध्ये गळा दाबून तिची हत्या केली.
पोलिसांपुढे होते मोठे आव्हान
मृतदेह सापडला नसतानाही मारेकऱ्यांचे दोषत्व सिद्ध करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलिसांनी विविध फॉरेन्सिक रिपोर्ट, डीएनए रिपोर्ट, सीडीआर, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषत्व सिद्ध करण्यात यश मिळवले. दोन्ही आरोपींविरुद्ध 2021मध्ये आरोपनिश्चिती करण्यात आली होती.
हत्याकांडामागील धक्कादायक कारण
सिद्धेश सलूनमध्ये नीट काम करीत नव्हता. त्यामुळे कीर्तीने त्याला समज दिली होती. त्यानंतरही सिद्धेश सुधारला नाही. शेवटी कीर्तीने त्याला कामावरून काढून टाकण्याची नोटीस दिली. या रागातून सिद्धेशने कामावरील शेवटच्या दिवशी मैत्रीण खुशीला सोबत घेतले आणि कीर्तीची हत्या केली. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने कीर्तीचा मृतदेह वडाळा खाडीत फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. या हत्याकांडाने मुंबईसह सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List