केरळात मॉन्सूनची चाहूल तर महाराष्ट्रासह देशात उन्हाचा ताप वाढला
राज्यातील आणि देशातील हवामानात सातत्याने बदल होत असून दक्षिणेत केरळमध्ये मॉन्सूनचे संकेत मिळत आहे. तर उत्तर हिंदुस्थानात उन्हाचा ताप वाढतच आहे. महाराष्ट्रातही वैशाख वणवा पेटल्याचे दिसत आहे. मॉन्सूनचे आगमन होईपर्यंत नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. येत्या 3 जूनपर्यंत तापामानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
रमेल चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवासाला वेग आला आहे. त्यामुळे आगामी 2-3 दिवसांत मॉन्सून केरळमध्ये प्रवेश करणार आहे. यंदा मॉन्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता त्याच्या प्रवासाला वेग आला असून दोन ते तीन दिवसात तो केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच त्याच्या पुढील वाटचालीसही पोषक वातावरण तयार झाले आहे.
देशात मॉन्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यंदा देशात सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज असून, ईशान्य भारत वगळता देशाच्या अन्य भागात मान्सून सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. देशात मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर उत्तर हिंदुस्थानातील जनतेला उन्हाच्या तापापासून दिलासा मिळणार आहे.
बौद्ध पोर्णिमेनंतरचे 9 दिवस उत्तर हिंदुस्थानात नवतपा म्हणून ओळखले जातात. या काळात सूर्य पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याची थेट किरणे पृथ्वीवर पडतात. त्यामुळे तापमानात सर्वाधिक वाढ होते. नवतपा या शब्दाप्रमाणेच आता महाराष्ट्रासह उत्तर हिंदुस्थानात उन्हाचा ताप जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच वाढत्या तापमानामुळे नागरिकांची होरपळ होत आहे. सोमवारी ब्रम्हपुरीत 47.1अंश तापमान होते. तर नागपूरचा पाराही यंदा पहिल्यांदाच 45.6 अंशाच्या वर गेला आहे.
उत्तर हिंदुस्थानसह विदर्भ, मराठवाड्यात नवतपाचा तिसरा दिवस आणखी तापमान वाढवणारा ठरला. नागपूर खालोखाल अमरावती व वर्धामध्ये पारा 45 अंशावर पोहचला आहे. हवामान खात्याने 29 मेपर्यंत विदर्भात तापमानवाढीची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस आणखी तापमानवाढीचे ठरणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List