महायुतीत आलबेल नाही, अजित पवार गट- भाजपत जुंपली; भुजबळांच्या दाव्यावर मुनगंटीवारांचा पलटवार
लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना महायुतीत सर्व आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकांचे सर्व टप्पे पूर्ण झाले नसतानाच अजित पवार गट आणि भाजपमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन जुंपली आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आम्हाला विधानसभा निवडणुकीसाठी 80 ते 90 जागा पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर भाजप नेते सुधार मुनगंटीवार यांनी पलटवार करत भुजबळ यांना सुनावले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी यावर्षात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महायुतीत दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या एका विधानावरून महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एक निवडणूक झाली. आता यापुढे महायुतीत आपल्याला योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा त्यांनी आपल्याला 80 ते 90 जागा मिळतील असे सांगितले होते. लोकसभेवेळी जी खटपट झाली तशी यापुढे होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे, हे त्यांना सांगावेच लागेल. तेवढ्या मिळाल्या तर 50, 60 जण निवडून येतील. अन्यथा तुमच्या 50 जागा आहेत, मग 50 घ्या, असे ते म्हणाले तर त्यातून पुन्हा किती निवडून येणार, असे विधान छगन भुजबळ यांनी केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भुजबळांवर पलटवार केला आहे.
लोकसभेचे जागावाटप असेल किंवा विधानसभेच्या जागावाटपाबाबत काही मागणी असेल, तर ती मीडियाच्या माध्यमातून होत नाही. यातून काही कारण नसताना अडचणी आणि समस्या निर्माण होतात. विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही मत असेल किंवा इतरांचे मत असेल, त्यावर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली पाहिजे. मीडियाच्या माध्यमातून आम्हाला इतक्या जागा हव्यात, असे म्हणणे गैर आहे. यामध्ये तुम्हाला कोणी आश्वस्थ केले, याचा कोणताही पुरावा नसतो, तरीही सांगायचे असेल तर स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आम्हाला एवढ्या जागा देण्यासंदर्भात या नेत्यांने शब्द दिला होता. पण अशा प्रकारचे धुके निर्माण करण्यात काहीही कारण नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीनही पक्षाचे नेते एकत्रित बसतील. योग्य फॉर्म्युला ठरवतील. त्यानुसार तीनही पक्षाला जागा मिळतील. भाजपा सर्वांत मोठा पक्ष असल्याने भाजपाला सर्वांत जास्त जागा मिळतील. मात्र, आमच्याबरोबरच्या दोनही पक्षाचा सन्मान केला जाईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, अजित पवार गट आणि भाजपातील दावे, प्रतिदावे यामुळे महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List