अर्धवट रस्ते, अपूर्ण नालेसफाई, वाहतूक कोंडीने दहिसरकर हैराण; शिवसेनेची उद्या पालिकेवर धडक
दहिसर विभागात रस्त्याची अर्धवट असलेली आणि दर्जाहीन कामे झाली असून रस्ते बांधण्याच्या नावाखाली पूर्व-पश्चिम विभागात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय नाल्यांची अर्धवट बांधकामे, अपूर्ण नालेसफाई, दहिसर नदीमध्ये अद्याप असलेला गाळ यामुळे दहिसरकर प्रचंड हैराण झाले आहेत. याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या वतीने उपनेते, माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आर/उत्तर दहिसर कार्यालयावर बुधवार 29 मे रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना दहिसरमधील पावसाळापूर्व कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. प्रदूषण, मोकळे रस्ते, कमी पाणीपुरवठा यासारख्या अनेक समस्यांनी दहिसरकरांना भंडावून सोडले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद दिला जाता नाही. या पार्श्वभूमीवर 29 मे रोजी सकाळी 10 वाजता दहिसर पश्चिम येथील विभाग कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी दहिसरमधील सर्व रस्ते, नाल्यांची नुकतील पाहणी करून आढावा घेतला.
या वेळी सर्वच पावसाळापूर्व कामांची दूरवस्था असल्याचे निदर्शनास आले. राज्य सरकार, मुंबई महापालिका अशा नागरिकांच्या साध्या, छोटय़ा अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडत आहे. दहिसर पूर्व, पश्चिमेचा विस्तार पाहिल्यास वाहतूक कोंडीने दहिसरवासीयांना प्रचंड त्रास होतोय. प्रदूषण वाढत असतानाच स्वच्छ, निरोगी हवेचा अधिकारही हिरावला जात आहे. याकडे मुंबई महापालिका कधी लक्ष देणार आहे का, असा सवाल घोसाळकर यांनी केला आहे.
…तर पावसाळ्यात दहिसरची कोंडी
दहिसरमधील पावसाळापूर्व कामांची स्थिती पाहिल्यास पावसाळ्यात रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागण्याची भीती आहे. जागोजागी खराब रस्ते, रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे पाणी तुंबण्याचाही धोका आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दहिसर पूर्वेतील आनंद नगर मेट्रो स्टेशन (शिव मदीरजवळ) येथून सकाळी 9.30 वाजता निघून आर/उत्तर विभाग कार्यालय (रुस्तमजी शाळा, दहिसर पश्चिम) येथे 10 वाजता धडकणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List