आता अकरावी प्रवेशाची चढाओढ; टक्के वाढल्याने नामवंत महाविद्यालयांत प्रवेशाची स्पर्धा
दहावीचा निकाल जाहीर झाला. आता अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची होणारी चढाओढ पहायला मिळणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या लाखो जागा रिक्त राहत असल्या तरी काही नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा रंगण्याचे चित्र यंदाही कायम असणार आहे. मुंबई विभागात तब्बल 13 हजार 430 विद्यार्थी 90 टक्क्यांच्या वर आहेत. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या यंदा दीड हजारांपेक्षा जास्त आहे. या विद्यार्थ्यांमध्ये सीबीएसई, आयसीएसई आणि इतर बोर्डातील 90 टक्क्यांवरील विद्यार्थ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा मार्ग खडतर असेल, अशी चिन्हे सध्या आहे.
बोर्डाच्या वाढलेल्या टक्केवारीचा परिणाम अकरावीच्या कटऑफवर होणार आहे. नामांकित महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये यंदा दीड ते दोन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या निकालापाठोपाठ राज्य मंडळाचा निकालही आता जाहीर झाला. मुंबई विभागाच्या दहावीचा निकाल यंदा 95.83 टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल तब्बल 2.17 टक्क्यांनी वाढला आहे. निकाल वाढल्याने 90पेक्षा अधिक गुण मिळवणाऱयांची संख्या ही वाढली आहे. सीबीएसई, आयसीएसई मंडळाचा निकाल राज्य मंडळाच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे नामवंत महाविद्यालयांसाठी आवश्यक असणारी टक्केवारी असलेले विद्यार्थी सर्वच मंडळात आहेत. यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचा टक्का वाढलेला दिसणार आहे. पहिली यादी सर्वच नामांकित महाविद्यालयांचा कटऑफचा टक्का 95 वर पोहोचेल असे चित्र आहे. त्यामुळे झेवियर्स, मिठीबाई, रुईया, पोद्दार, रुपारेल, साठये, केसी, एचआर, कीर्ती आणि हिंदुजा आदी नामवंत महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी सर्वच शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ होणार आहे.
विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले तर ते नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी अर्ज करतात. त्यामुळे यंदाही प्रवेशासाठी स्पर्धा वाढेल असे चित्र असल्याचे मत काही प्राचार्यांनी व्यक्त केले. अनुदानित महाविद्यालयांत फी कमी असल्याने या महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-पालक उत्सुक असतात. मात्र विनाअनुदानित काही मोजक्या तुकडय़ांना डिमांड असतो. अन्य दुय्यम महाविद्यालयांकडे विद्यार्थी फारसे फिरकत नाहीत. गेल्या वर्षी 242 महाविद्यालयांत एकही प्रवेश झाला नव्हता.
80 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई महानगर क्षेत्रातून अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 80 हजार 260 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज नोंदणी करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यातील 40, 978 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज लॉक केले असून 18,584 विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणीदेखील पूर्ण झाली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दोन दिवस अर्ज भाग 1 भरण्यास मुदत दिली जाणार असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले होते. आता दहावीचा निकाल जाहीर झाला असून अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
गेल्या वर्षीच्या प्रवेशाची आकडेवारी
एपूण महाविद्यालये – 1022
एपूण जागा – 389675
झालेले प्रवेश – 267862
रिक्त जागा – 121813
कोटा जागा – 87566
कोटा प्रवेश – 55938
कोटा रिक्त जागा – 31628
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List