महापालिका शाळेची मुले हुश्शार… दहावीचा निकाल सात टक्क्यांनी वाढला; एकूण निकाल 91.56 टक्के
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी 6.79 टक्क्यांनी वाढला असून एकूण निकाल 91.56 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल 84.77 टक्के लागला होता. पालिका शाळांमध्ये कुलाबा माध्यमिक शाळेतील विद्यार्थी आयुष रामदास जाधव हा 97.40 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च 2024मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल आज झाला असून यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 248 माध्यमिक शाळांमधून एपूण 16 हजार 140 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 14 हजार 778 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महानगरपालिकेच्या 79 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यासह 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले 63 विद्यार्थी आहेत. सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान आयुष जाधव, तर द्वितीय क्रमांक खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेचा वरुण चौरसिया या विद्यार्थ्याने मिळविला असून त्याला 97.20 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तिसरा क्रमांक याच शाळेचा कुमार आदित्य वानखेडे या विद्यार्थ्याने मिळविला असून त्याला 96 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उप आयुक्त चंदा जाधव, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी यांनी अभिनंदन केले आहे.
अशी आहे निकालाची परंपरा
महानगरपालिका शाळांचा दहावीचा विचार करता मार्च 2020मध्ये 93.25 टक्के, मार्च 2021मध्ये 100 टक्के, मार्च 2022मध्ये 97.10 टक्के, मार्च 2023मध्ये 84.77 टक्के व या वर्षी मार्च 2024मध्ये 91.56 टक्के निकाल लागला आहे.
70 शाळांचा निकाल 100 टक्के
गतवर्षी 42 शाळांचा 100 टक्के निकाल लागला. या वर्षी मार्च 2024मध्ये 79 शाळांचा 100 टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 53 होती. यंदा त्यात दहा विद्यार्थ्यांची वाढ होऊन ही संख्या 63 झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List