शुभमंगल… सावधान! खोटे विवाह लावणारी टोळी चतुर्भुज
खोटा विवाह लावून देगाव (वा.) गावातील कुटुंबाची 3 लाख 21 हजारांची आर्थिक फसवणूक करणाऱया सहाजणांच्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने खोटा विवाह लावून तालुक्यातील अनेकांना गंडा घातल्याचा संशय असून, त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
देगांव (वा) (ता. मोहोळ) येथील नितीन विष्णू भोसले (वय 25) हे मुंबई येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. नितीन याचा थोरला भाऊ सचिन (वय 30) याच्या विवाहासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. मात्र, विवाह जुळून येत नव्हता. नितीन याने त्याच्या मावस भावाला सचिनसाठी मुलगी बघ, असे सांगितले होते. मावस भावाने विवाह जुळविणारा एजंट गंगाधर लाडवा ढेरे (रा. कोळेगाव बुद्रूक, ता. भोकर, नांदेड) याचा नंबर नितीनला दिला. दिलेल्या नंबरवर नितीनने संपर्क साधला असता, मुलगी आहे; मात्र विवाह जमला तर रोख अडीच लाख व गाडी भाडय़ासाठी अकरा हजार रुपये रोख असे एकूण 2 लाख 61 हजार रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली. ती अट मान्य झाल्यावर मुलीकडच्या मंडळींनी व्हॉट्सऍपवर मुलीचे फोटो पाठविले. घरातील सर्वांना मुलगी पसंत पडल्यावर नितीनच्या कुटुंबीयांनी रक्कम देण्याची तयार दाखविली.
घरी आल्यावर सर्वांची संयुक्त बैठक झाली. ठरल्याप्रमाणे रोख रक्कम देण्याचे व त्याचदिवशी विवाह करण्याचे ठरले. त्याप्रमाणे नितीनच्या फोन-पे वरून 5 वेळा 1 लाख 30 हजार रुपये पाठवून दिले. त्याचवेळी सचिन यानेही चारवेळा वेगवेगळी रक्कम पाठवली. एकूण 2 लाख 41 हजार रुपये मुलीच्या नातेवाईकांना पोहोचले. पैसे मिळाल्यावर त्याचदिवशी 2 एप्रिल रोजी सायंकाळी भोसले कुटुंबीयांच्या घरी विवाह सोहळा पार पडला. आलेले नातेवाईक मुलीला सासरी सोडून गेले. दरम्यान, 10 एप्रिल रोजी मुलीचे भावोजी शैलेश याचा फोन आला. ‘घरी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे. तुम्ही मुलीला घेऊन या, तसेच कार्यक्रम संपल्यावर परत घेऊन जा.’ त्याप्रमाणे वडील व मुलगी 13 एप्रिल रोजी रात्री खासगी लक्झरीने गेले. ते 14 रोजी सकाळी नागपूर हायवेवर उतरले. त्यावेळी शैलेशही तेथे आला होता. रिक्षा करून मुलगी व विष्णू भोसले यांना अकोला बसस्थानकावर घेऊन गेला.
विवाहित मुलगी लघुशंकेचे निमित्त करून गेली ती परत आलीच नाही. तर शैलेश याने आपल्याला घरी जाण्यासाठी गाडी येणार आहे. ती आली का बघून येतो, असे सांगून गेला तो ही गायब झाला. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर विष्णू भोसले यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान, 25 मे रोजी नितीन भोसले व कुटुंबीयांना समजले की, आपली फसवणूक केलेल्या महिला पेनूर (ता. मोहोळ) येथील एका मंगल कार्यालयात कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रथमेश भोसले यांचा फसवून विवाह करण्यासाठी येणार आहेत. खातरजमा करण्यासाठी नितीन भोसले व कुटुंबीय पेनूर येथील मंगल कार्यालयात गेले. त्या ठिकाणी फसवणूक केलेल्या महिला त्यांना दिसून आल्या. नितीन भोसले कुटुंबीयांनी तातडीने याबाबत मोहोळ पोलिसांना माहिती दिली.
मोहोळचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत आदलिंगे यांच्या पथकाने पेनूरला मंगल कार्यालयातून चार महिलांना अटक केली. याप्रकरणी नितीन भोसले (रा. देगाव (वा) यांनी मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील दोघे फरार आहेत. अटक केलेल्या चौघींना गुरुवारपर्यंत पोलास कोठडी मिळाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List