मोहोळमध्ये फळबागांसह पिके, विजेचे खांब भुईसपाट
तालुक्यात सर्वत्र मेघगर्जना आणि तुफान वादळीवाऱयासह रविवारी रात्री झालेल्या पावसाने आज दुसऱया दिवशीही हजेरी लावली. या पावसाने शेतातील पिके, बागा, विजेचे खांब भुईसपाट झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी लोक जखमी झाले आहेत. केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. काही ठिकाणी विजा पडल्याने झाडांनी पेट घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
दरम्यान, मोहोळ तालुक्यात वादळी वाऱयाने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने त्वरित पंचनाने करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी लोकसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते संजय क्षीरसागर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
मोहोळ तालुक्यात मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील खंडाळी, पापरी, कोन्हेरी, हिवरे, पेनूर, पाटकूल, टाकळी सिकंदर, कुरूल, कामती, शेजबाभूळगाव, सय्यद वरवडे नजीक पिंपरी, वाळूज, भैरववाडी, देगाव, नरखेड मनगोळी, बोपले तसेच वडवळ ढोकबाभूळगाव, गोटेवाडी, रामहिंगणी, आष्टे, खुनेश्वर, भांबेवाडी, भोयरे, घाटणे, डिकसळ, मसलेचौधरी, लांबोटी, शिरापूर, पोफळी यांसह सर्वत्र मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पाऊस कमी; पण वादळी वाऱयाने शेतीसह घरांचे, बागांचे व वीज वितरण कंपनीचे खांब विद्युत जनित्र तारा तुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱयाचा सर्वाधिक फटका खंडाळी, पापरी परिसराला बसला आहे. खंडाळी येथे वादळी वाऱयाने झाडे उन्मळून पडली, तर अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले.
झाड पडून म्हैस दगावली, केळी बाग उद्ध्वस्त
डिकसळ येथील दत्तात्रय त्र्यंबक धावणे यांच्या घरावरील सर्व पत्रे उडून गेले. खंडाळी येथील उत्तम मुळे यांच्या घराजवळील चिंचेचे झाड म्हशीच्या अंगावर पडून म्हैस दगावली आहे. पापरी येथील अंकुश भोसले, तात्यासाहेब भोसले, साहेबराव भोसले, समाधान सावंत, विठ्ठल भोसले यांच्या घरावर पत्रे, तर शाहू भोसले यांची केळीची बाग भुईसपाट झाली. खवणी येथे श्री बिरोबा मंदिराच्या शिखरावर विजेचा स्पर्श झाल्याने शिखरास भेगा पडल्या. देगाव (वा) व वाळूज (दे) परिसरातील महादेव दगडू कादे यांची लिंबूनी बागेतील सुमारे 150 झाडे उद्ध्वस्त झाली आहेत.
मोहोळ तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळ आणि पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. केळी, आंबा, डाळिंब या फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक अंदाजानुसार दीडशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– सचिन मुळीक, तहसीलदार, मोहोळ
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List