वैद्यकीय चाचण्यांसाठी जामीन 7 दिवसांनी वाढवा; केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका
अटकेनंतर वजन 7 किलोने घटले असून शरीरातील कीटोनची पातळी वाढली आहे. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असे स्पष्ट करत वैद्यकीय कारणास्तव जामिनात आणखी 7 दिवसांची वाढ करावी. अशी मागणी करणारी नवी याचिका कथित दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी 1 जूनपर्यंत जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
ईडीने अटक केल्यानंतर 50 दिवसांनी केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला होता. 10 मे रोजी त्यांची दिल्लीतील तिहार तुरुंगातून सुटका झाली. ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिकाही केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना विशेष सवलत दिली नसल्याचे स्पष्ट केले. जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवाल त्यांच्या प्रचारसभांत म्हणत होते, जर लोकांनी आपला मत दिले तर 2 जूनला तुरुंगात जावे लागणार नाही, असा दावा ईडीने केला होता.
डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
डॉक्टरांनी अरविंद केजरीवाल यांना पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्पॅन तसेच इतर काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे केजरीवाल यांनी अंतरिम जामिनासाठी मुदतवाढ मागितली आहे. तुरुंगात असताना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली असूनही त्यांना इन्सुलिन दिले जात नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर त्यांना इन्सुलिन देण्यात आले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List