कुत्रा, मांजर, गुरेढोरांना 24 तास मोफत उपचार; महालक्ष्मीमध्ये पालिकेचे पहिले पशुवैद्यकीय रुग्णालय
मुंबईत पाळीव आणि भटक्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते, मात्र आता मुंबईकरांची ही गैरसोय महापालिकेने दूर केली आहे. महालक्ष्मी येथे पशुवैद्यकीय रुग्णालय जूनच्या दुसऱया आठवडय़ापासून खुले होणार असून यात भटके आणि पाळीव कुत्रा, मांजर, गुरेढोरांवर 24 तास उपचार मिळणार आहेत. दरम्यान, अद्ययावत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
मुंबईत सुमारे 1 लाख 15 हजार पाळीव प्राणी आहेत. यामध्ये गुरे, म्हशी, शेळय़ा-मेंढय़ा, श्वान आदींचा समावेश आहे. यामध्ये पाळीव कुत्र्यांची संख्या सुमारे 36 हजार 500 तर भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे 98 हजार 700 पेक्षा जास्त आहे तर मांजरांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. या प्राण्यांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी सध्या महापालिकेचा खार येथे एकच पशुवैद्यकीय दवाखाना आहे तर मुंबई शहर व उपनगरात सुमारे 200 खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परळमध्ये मुंबई सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ऑनिमल संस्थेचे खासगी रुग्णालय आहे.
जखमी, आजारी प्राण्यांवरही उपचार!
रुग्णालयात सुमारे 400 प्राण्यांवर उपचार करता येणार आहेत. रुग्णालयात जखमी, आजारी, भटक्या जनावरांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. भटक्या जनावरांना 24 तास मोफत रुग्णवाहिकेची सेवा असणार आहे. शस्त्रक्रिया, गायनॉकोलॉजी, अपघात, इमर्जन्सी वॉर्ड, आयसीयू, आसीसीयू, पॅन्सर वॉर्ड, बर्न अॅण्ड स्कीन वॉर्ड, ओपीडी मेडिसिन-ओपीडी, सीटी स्पॅन, एमआरआय, रेडिओलॉजी सोनोग्राफी, ब्लड बँक, डायलेसिस सेंटर अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध असतील.
मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी पैसे आकारणार
मुंबईत मोठय़ा प्रमाणात पाळीव कुत्रे असून एका घरात दोन ते तीन कुत्रे पाळलेले असतात. महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात कुत्रे मांजरांवर मोफत उपचार होणार आहेत, मात्र मोठी शस्त्रक्रिया, सीटीस्पॅन, एमआरआय यासाठी पैसे आकारण्यात येणार आहेत.
– पाळीव आणि भटक्या प्राण्यांसाठी असलेली यंत्रणा अपुरी पडत असल्याने पालिकेने टाटाच्या सहकार्याने हे रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाची उभारणी टाटा ट्रस्टकडून करण्यात आली आहे. देखभाल, वैद्यकीय सेवाही टाटा ट्रस्ट करणार आहे.
– पालिकेने पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी महालक्ष्मी येथे टाटा ट्रस्टला 4340.19 चौरस मीटर जागा दिली आहे.
– या रुग्णालयात प्राण्यांवर अद्ययावत आणि अत्याधुनिक उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
– बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर मुंबई पालिका व टाटा ट्रस्ट यांच्यात करार झाला आहे.
मुंबईतील प्राण्यांची संख्या
गुरे, म्हशी, शेळ्या, मेंढ्या असे एकूण 1 लाख 15 हजार प्राणी आहेत तर पाळीव व भटक्या कुत्र्यांची संख्या 1 लाख 36 हजार आहे. मांजरांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List