मायकल वॉनने काढली पाकिस्तानी पत्रकाराची इज्जत
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील प्ले ऑफच्या सामन्यांपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आयपीएल खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंना मायदेशी बोलावले. मात्र बोर्डाचा हा निर्णय चुकीचा असून, पाकिस्तान-इंग्लड टी-20 मालिकेपेक्षा आयपीएल हे मोठे व्यासपीठ आहे, असे विधान इंग्लंड संघाचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी केले. यावरून एका पाकिस्तानी पत्रकाराने वॉन यांची माफी मागावी असे म्हटले, मात्र मायकल वॉनने आपण माफी मागणार नाही, असे सोशल मीडियावर स्पष्ट करून त्या पाकिस्तानी पत्रकाराचीच इज्जत काढली.
मायकल वॉन म्हणाला की, फिलिप सॉल्ट, जोस बटलर आणि विल जॅक्स यांसारख्या खेळाडूंना आयपीएल नॉकआऊट सामन्यांद्वारे टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी चांगली तयारी करण्याची संधी होती. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका या खेळाडूंसाठी तेवढी फायदेशीर ठरली नाही. आयपीएल ‘प्ले ऑफ’मध्ये जास्त प्रेशर होता. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी आयपीएलमधून चांगली तयारी करता आली असती. मायकल वॉनच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानी पत्रकार फरीद खान याला राग आला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत मायकल वॉन याला सुनावले अन् माफी मागण्याची मागणी केली.
फरीद खान म्हणाला की, मायकल वॉन याने आयपीएलवर आपलं वक्तव्य करत पाकिस्तानी गोलंदाजांचा अपमान केला आहे. जर आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर पाकिस्तानच्या चाहत्यांची माफी मागणार का? तुम्हाला आयपीएल कॉण्ट्रक्ट हवे की आणखी काही? असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले, मात्र फरीद खानच्या ट्विटनंतर मायकल वॉनने फक्त ‘नाही’ अशा एका शब्दात याला सडेतोड उत्तर दिले. म्हणजेच मायकल वॉन कोणत्याही स्थितीमध्ये पाकिस्तानी चाहत्यांची माफी मागणार नाही. वॉनच्या या उत्तराने पाकिस्तानी पत्रकारांचा जळफळाट झाला असेल एवढे नक्की.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List