परीक्षण – विरह काव्याचा प्रभावी रसास्वाद
>> श्रीकांत आंब्रे
महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ या कथाकाव्याचे मराठी अनुवाद ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज ते ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्यापर्यंत अनेक साहित्यिकांनी केले आहेत. संस्कृत भाषेतून ‘मेघदूत’ समजून घेणे आणि त्याचा भावानुवाद करणे ही गोष्ट नक्कीच सोपी नाही. प्रतिभेचे सामर्थ्य आणि संवेदनक्षम कवीमन असेल तरच मूळ काव्याचा आस्वाद अधिक प्रत्ययकारीपणे आविष्कृत करता येतो. अनुवादापेक्षा ‘मेघदूता’तील विरहाच्या भावावस्थेचा रसास्वाद घेऊन तो आपल्याला कसकसा भावला हे रसिक वाचकांपुढे विविध अंगांनी रसग्रहणात्मक पद्धतीने मांडले तर त्यातून अधिक उत्कटतेने ‘मेघदूत’ काव्याचे रसपान प्रभावीपणे करता येते, याचा प्रत्यय ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार आणि ललित लेखक प्रवीण दवणे यांनी आपल्या ‘विरहार्त’ या लेखसंग्रहातून दिला आहे. त्याला त्यांनी चिरंतन प्रीतीची भावार्थ साद असे म्हटले आहे. ललित गद्याच्या थाटाने या ‘मेघदूता’चे रसग्रहण करताना अनुभवलेल्या स्वानंदासह त्यातील निसर्गरंगांचे वेगळपण व वैशिष्टय़ सांगणाऱ्या लेखांचा कथन स्वरूपात समावेश केल्याने या आस्वादक ललित गद्याची खुमारी आणि नजाकत वाढली आहे. मनाला हुरहुर लावणाऱया या विरहिणी मग स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून मनाला भिडत राहतात. रसनिरुपणातून पाझरणारे हे निसर्ग भावसंगीत एक वेगळीच अनुभूती देऊन जाते, ही प्रवीण दवणे यांच्या प्रतिभेची किमया आहे.
विरह काव्याच्या रसास्वादाचा आस्वाद दवणे यांनी ‘मेघदूता’पुरताच मर्यादित न ठेवता ज्ञानेश्वरांच्या विराण्या, त्यातील कृष्णविरहिणीची तळमळ, शृंगाररसाला वात्सल्य आणि भक्तिरसाची जोड दिल्यामुळे हा भावोत्कट अनुभव अधिक गडद होतो. शब्दात व्यक्त होऊनसुद्धा शब्दापलीकडे असलेल्या संत मुक्ताबाईंच्या अभंगांतील सुस्पष्टता आणि आपली अभिव्यक्ती थेट मांडण्याची त्यांची सरळसोट वृत्ती दवणे यांनी त्यांच्यावरील लेखातून ठळकपणे अधोरेखित केली आहे. काळाच्या कितीतरी पुढे असलेली ही संतकवयित्री इतर संतमेळ्याला कळेल की न कळेल अशा तऱहेने काही वेळा गूढ पद्धतीने विजेच्या लोळासारखी काव्यातून कोसळते आणि त्याच तेजाने, आवेगाने व्यक्त होते हे विविध उदाहरणे देत त्यांनी स्पष्ट केले आहे. मुक्ताबाईचे ताटीचे अभंगच नव्हे, तर तिचे इतरही काव्य हे तिच्यात ‘अंतरीचं गुज’ कसे आहे, हेही ते प्रभावीपणे सांगतात. ‘मीरा : एक तृषार्त’ या लेखात त्यांनी मीरा या भाववृत्तीभोवती गुंफल्या गेलेल्या लौकिक गोष्टींचे शेवाळ दूर करून मीरा हा अथांग डोह नितळ दृष्टीने अनुभवणे ही अवघड साधना कशी आहे, याच परिशिलन केले आहे. तिच्या विविध रचनांद्वारे कृष्णाविषयी तिच्या मनातील भावना जाणून घेताना मीरा ही आत्म्याने परमात्म्याला दिलेली साद आहे आणि त्यात एका समर्पित प्रेयसीचे भावोत्कट रूप तिच्या सादेला कसे येते याचे वर्णन त्यांनी केले आहे. रसिक वाचकांना आंतरिक समृद्ध करणारा हा लालित्यपूर्ण शब्दानुभव वेगळाच आनंद देऊन जाईल.
विरहार्त (लेखसंग्रह)
लेखक : प्रवीण दवणे
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
मूल्य : रुपये 260/- पृष्ठे : 136
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List