वाचावे असे काही – नातेसंबंधाचा सूक्ष्म व्यापार
>> धीरज कुलकर्णी
माणसांचे आपापसातील क्लिष्ट संबंध आणि त्यातून उद्भवणारी गुंतागुंत हा जगभरातील लेखकांचा चिंतनाचा विषय. यातून अनेक गहन व श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली आहे.
ज्येष्ठ कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांची ‘मंद्र’ ही महाकादंबरी कलाकाराच्या दृष्टिकोनातून बाह्य जड जगाकडे, नात्यांकडे बघते. उमा वि. कुलकर्णी यांनी या कादंबरीचा मराठीत उत्तम अनुवाद केला आहे.
असं म्हणतात की, कलाकार हा जन्मावा लागतो. हे जरी वरकरणी खरे विधान वाटत असले तरी कोणत्याही कलेमध्ये करावी लागणारी मेहनत कुणाला चुकत नाही. ही मेहनतच त्याला उच्च पदावर घेऊन जाते.
मोहनलाल गरिबीतून वर आलेला धडपड्या गायक. हरिद्वारला भजन म्हणून पोट भरणारा हा लहान मुलगा चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मोठा गायक होतो. हिंदुस्थानभर आणि हिंदुस्थानबाहेरही अनेक कार्पाम करतो. अमाप पैसा मिळवतो आणि गमावतोही.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मोहनलालला अनेक प्रकारची माणसे भेटतात. त्याच्यावर प्रेम करणारी, त्याला मदत करणारी ही माणसे प्रसंगी त्या मदतीची किंमत वसूल करतात. जगाची ही रीत मोहनलालला उशिरा लक्षात येते.
बालपणी त्याला गायनाचे उत्तम प्रशिक्षण तर मिळाले, पण त्याचे शालेय शिक्षण झाले नाही. लहानपणीच आईवडिलांना गमावल्यामुळे त्याला योग्य संस्कार आणि प्रेम मिळालं नाही. त्यामुळे सामान्य माणसाला असणारे कापोधादी विकार कसे आवरावेत त्याला कळत नाही. आयुष्यभर त्याला ‘काम’ त्रास देतो. स्त्रिया विविध प्रकारे त्याच्या आयुष्यात प्रवेश करतात.
त्यांच्या बाह्य रूपाला तो सतत भुलतो आणि फसत राहतो. मोहनलालला हे कळत नाही असं नाही. त्याला माहितेय की, आपल्यामधील ‘काम’ हा आपल्याला सतत मोहात पाडतो, पण त्या आवेगापुढे तो हतबल आहे.
मोहनलालला गाण्याला साथ करणारे आणि प्रत्यक्ष आयुष्यातदेखील साथ करणारे टिपणीससारखे मित्र भेटले, पण ते विरळाच!
गुरू राजासाहेब यांच्या तालमीत असताना भेटलेली चुन्नी, पहिल्या लग्नाची त्याची बायको रामकुमारी, नंतर भेटलेली उच्चभ्रू घरातील चंपा, तिने सोडल्यानंतर नृत्यांगना मनोहरी दास, शिष्या मधू आणिही अनेक…
या आवर्तात मोहनलाल भोवंडून गेलाय. अखेरीस सर्व गोष्टींचा त्याग करून तो आपल्या मूळ गावी हरिद्वारला येतो व तिथेच संन्यस्त वृत्तीने राहून शिष्यांना तयार करण्याचा निश्चय करतो.
भैरप्पांच्या इतर कादंबऱयांप्रमाणेच ‘मंद्र’ हीसुद्धा काळाचा आणि व्यक्तींचा एक मोठा पट उलगडून आपल्यासमोर ठेवते. कादंबरी म्हणजे फक्त एका प्रमुख पात्राचे आत्मनिवेदन नाही, तर कथेच्या अनुषंगाने त्यातील प्रमुख पात्रांचाही मनोव्यापार आहे. कथेला पुढे नेण्यास सर्व मदत करतात.
मोहनलाल हे पात्र प्रमुख असूनही रामकुमारी, चंपा, चुन्नी, मनोहरी ही पात्रेही कादंबरीत महत्त्वाची भूमिका निभावतात.
प्रत्येक मनुष्य हा काही प्रमाणात का होईना, स्वार्थी आहेच. समोरच्या व्यक्तीचा नीट फायदा कसा करून घ्यायचा हे काही लोकांना अगदी व्यवस्थित समजते. व्यवहारात अशा लोकांना यशस्वी समजले जाते. मात्र असे अतिहुशार लोक नात्यांमधील प्रेमाला मुकतात. नाती फक्त वापरण्यासाठी असल्याचा त्यांचा समज असतो. मात्र नि:स्वार्थ प्रेम ही कोणत्याही नात्याची प्राथमिक गरज आहे हे ते विसरतात.
मोहनलालला औरस आणि अनौरस मुलेबाळे आहेत, पण तीही त्याचे फक्त नाव वापरण्यासाठी. यातील कुणालाच मोहनलालची कला, मेहनत नको आहे. लेखक यानिमित्ताने नव्या पिढीतील झटपट प्रसिद्धीचा सोस दाखवतो.
कोणतीही कला, कौशल्य हे आपल्याला आयुष्यात खंबीरपणे आणि स्वतंत्रपणे उभे राहण्यासाठी मदत करते. मात्र हे स्वातंत्र्य जपण्यासाठी अनेक मोहांचा त्याग करावा लागतो आणि डोळसपणे स्वतकडे, नात्यांकडे पाहण्याची क्षमता माणसाकडे असावी लागते. अन्यथा तुमचे शोषण होण्याचा धोका अधिक.
मोहनलाल श्रेष्ठ कलाकार तर आहेच, पण तो कोणताही निर्णय विचारपूर्वक घेत नाही. स्वतच्या संवेदनांच्या आहारी जाऊन अयोग्य निर्णय घेतल्याने मोहनलालची ससेहोलपट होते. भैरप्पांनी मोहनलालच्या बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंतचा काळ यात घेतला आहे. हरिद्वारला गुरूंकडे घेतलेले शिक्षण, तिथून राजेसाहेबांकडचे शिक्षण, तिथे महादेवाच्या मंदिरात केलेली साधना हा काळ उत्कृष्टपणे लिहिला आहे. साधनेचे वर्णन वाचताना अनेकदा वाचक त्या वातावरणात तन्मय होतो.
कादंबरी अतिदीर्घ स्वरूपात असली तरी तिचा कंटाळा येत नाही याचे कारण म्हणजे सतत काही ना काही घटना घडत राहतात. प्रत्येक पात्राचा मनोव्यापार नीट दर्शविण्यासाठी कादंबरीचा एवढा विस्तार आवश्यक आहे. त्यामुळे केवळ कलाकाराच्या आयुष्यातील घटना आणि त्यापासून घ्यायचा बोध इतकेच कादंबरीचे प्रयोजन न राहता कादंबरी या साहित्य प्रकाराच्या आकृतिबंधाचा अभ्यास म्हणूनही ‘मंद्र’ अभ्यासनीय आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List