डिजिटल होर्डिंगचा वाहतुकीला धोका
घाटकोपर छेडानगर येथे झालेल्या दुर्घटनेमुळे होर्डिंगच्या धोक्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मुंबईतील डिजिटल होर्डिंगचाही वाहतुकीला धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिका डिजिटल होर्डिंगबाबत लवकरच नवे धोरण तयार करून अंमलबजावणी करणार आहे. यासाठी ‘आयआयटी’ तज्ञ आणि पालिकेतील अधिकारी अशी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दीड महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
घाटकोपर छेडानगर येथे महाकाय होर्डिंग कोसळून 17 जणांचा मृत्यू तर 97 जण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे मुंबईतील सर्व होर्डिंगच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालिका उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहे. नियमित होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असून धोकादायक व बेकायदेशीर होर्डिंग हटवले जात आहेत. तर आता डिजिटल होर्डिंगचा प्रकाश थेट चालकांच्या डोळय़ांवर येत असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर दुर्घटना व अपघात टाळण्यासाठी डिजिटल होर्डिंग्जबाबत लवकरच पॉलिसी बनवण्यात येत असून आयआयटी तंज्ञ व पालिकेतील काही अधिकारी असे सहा समिती सदस्य दीड महिन्यात अहवाल सादर करणार आहेत. मुंबईत सध्या महापालिकेच्या हद्दीत 1,100 होर्डिंग असून यामध्ये 70 होर्डिंग डिजिटल आहेत. तर साध्या होर्डिंगचे डिजिटलमध्ये रूपांतर करणे आणि डिजिटल होर्डिंग लावण्यासाठीही परवानगीसाठीही वारंवार विचारणा होत आहेत. मात्र डिजिटल होर्डिंग वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतात.
दादरच्या टिळक पुलावरील होर्डिंग जमीनदोस्त
घाटकोपर छेडानगर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईत हजारो होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे पालिकेने नियबाह्य बेकायदा होर्डिंगना नोटीस बजावली असून कारवाई करण्यासही सुरुवात केली जात आहे. यामध्ये दादरच्या टिळक पुलावरील होर्डिंगही पालिकेच्या माध्यमातून जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. ही होर्डिंग हटवण्यासाठी पालिकेने रेल्वेला नोटीस बजावली होती. मात्र होर्डिंग हटवण्यास असमर्थता दर्शवल्याने पालिकेकडून ही धोकादायक होर्डिंग हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे. या ठिकाणी आठ बेकायदा होर्डिंग होती.
अशी होतेय कार्यवाही
n सध्या डिजिटल होर्डिंग हे चलचित्रांसहित येत आहेत. यामुळे डोळय़ावर अधिक प्रकाश पडतो तसेच लक्षही विचलित होते. या होर्डिंगसाठी नियमावली असावी, अशी मागणी मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबई महापालिकेकडे केली होती. या मागणीनुसार नियमावली निश्चित करून त्याचा होर्डिंग धोरणात समावेश करण्यासाठी सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.
n सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर, पर्यावरणतज्ञ राकेश कुमार, आयआयटी मुंबईतील प्रा.अवजीत माजी आणि नागेंद्र राव वेलगा आणि प्रा.श्रीकुमार, मुंबई महापालिका लायसन्स विभागाचे अधिकारी अनिल काते यांचा समावेश आहे. या समितीची येत्या जूनमध्ये बैठक होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List